CM Post Banner : पवार घराण्यातील आणखी एक सदस्य भावी मुख्यमंत्र्यांच्या रांगेत; झळकले बॅनर - future cm board on pune mumbai expressway
Published : Sep 24, 2023, 11:20 AM IST
पिंपरी-चिंचवड(पुणे) : CM Post Banner :महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या (Maharashtra Politics Crisis) वेगाने घडामोडी बदलत आहेत. आता पहिल्यांदाच निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून पोस्टर्स लागल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय.
रोहित पवार भावी मुख्यमंत्री? : पुणे जिल्ह्यातील मावळ येथील टोलनाक्यावर हे बॅनर लागले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसर अजित पवारांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, सध्या पिंपरी-चिंचवड शहरात आमदार रोहित पवारांनी लक्ष घातलं असून, दौरे करायला सुरुवात केलीय. (Ajit Pawar vs Rohit Pawar) आमदार रोहित पवारांचा 29 सप्टेंबरला वाढदिवस असल्यामुळं मावळातील उर्से टोलनाक्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनर लावले आहे. या बॅनरमध्ये त्यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. काकांच्या बालेकिल्ल्यात पुतण्यानं अधिक लक्ष घातल्यानं आधीच जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच आता आमदार रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागल्यानं आगामी काळात काका-पुतण्यांमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवार भावी मुख्यमंत्री? : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांचाही भावी मुख्यमंत्री असा उल्लेख कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होता. तसेच राज्यातील विविध शहरांमध्ये अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री असतील अशा आशयाचे बॅनर कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. यावर खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं होतं.