Chandrayaan 3: चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी बाप्पाला साकडे; शिवसेनेकडून होमहवन आणि महाआरती - Chandrayaan 3 landing
Published : Aug 23, 2023, 4:52 PM IST
पुणे: चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडरच्या सॉफ्ट लँडिंगची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. कोट्यवधी भारतीय नागरिकांसह जगभरातील खगोलप्रेमींचे लक्ष भारताच्या चंद्रयान 3 मोहिमेकडे लागले आहे. इस्रो आज इतिहास घडवणार असून त्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. भारताची चंद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाली, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरणार आहे. चंद्रयान 3 मोहीम यशस्वी व्हावी यासाठी आज पुण्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सिद्धिविनायक असलेल्या, सारसबाग गणपती मंदिरात होमहवन तसेच महाआरती करण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे म्हणाले की, आज देशासाठी खूपच अभिमानाची बाब आहे. भारत हा पहिला देश जो चंद्राच्या दक्षिण ध्रुविय प्रदेशात आपले यान लँड करणार आहे. ही समस्त भारतीयांसाठी खूपच अभिमानाची बाब आहे. यानाचे यशस्वीरित्या लँडिंग व्हावे यासाठी आज समस्त पुणेकरांच्या वतीने सिद्धिविनायक गणपती मंदिरात होमहवन तसेच महाआरती करून बाप्पाला साकडे घालण्यात आले.