ताशी 100 किमी वेगानं धावणाऱ्या रेल्वेचे डबे झाले विलग, प्रवाशांचा उडाला थरकाप, पाहा व्हिडिओ - चंबल एक्स्प्रेस
Published : Dec 3, 2023, 7:36 AM IST
बांदा (उत्तर प्रदेश) Chambal Express Divided Into Two Parts : शनिवारी ग्वाल्हेरहून हावडाकडं जाणारी चंबल एक्स्प्रेस अचानक दोन भागात विभागली गेली. त्यामुळं प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. या घटनेची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वेचं तांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचलं. प्रेशर पाईपची दुरुस्ती करुन दोन्ही डबे जोडण्यात आले. यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. अपघात झाला तेव्हा ट्रेनचा वेग सुमारे 100 किमी प्रती तास होता. सुदैवानं मोठी दुर्घटना घडली नाही.
100 किमी प्रती तास वेगानं जात होती ट्रेन : झाशी-प्रयागराज रेल्वे मार्गावरील खैराडा आणि मातौंध स्थानकादरम्यान हा अपघात झालाय. शनिवारी दुपारी 2.00 च्या सुमारास ग्वाल्हेरहून हावडाकडं जाणारी चंबल एक्स्प्रेस 100 किमी ताशी वेगानं जात होती. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, अचानक ब्रेकचा आवाज आल्यानंतर ट्रेनचा एक डबा थांबला. ट्रेनचा दुसरा भाग सुमारे 300 मीटर पुढं जाऊन थांबला. डबा वेगळा झाल्याचं पाहून लोको पायलटनं ट्रेन थांबवली. पायलटनं रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर रेल्वेचं तांत्रिक पथक घटनास्थळी पोहोचलं. पथकानं पाईप दुरुस्त केल्यानंतर ट्रेन पुढं रवाना करण्यात आली. यादरम्यान सुमारे 34 मिनिटं रेल्वे मार्ग विस्कळीत झाला होता.