Pune Loksabha By Election : पुणे लोकसभा पोटनिवडणूक; सर्व्हेच ठरवणार भाजपचा उमेदवार - संजय काकडे - survey will decide final candidate in BJP
पुणे :खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्यातील लोकसभा पोटनिवडणूक होणार असल्याची चर्चा आणि भाजपसह काँग्रेसकडून देखील विविध उमेदवारांची चर्चा होत आहे. आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आधी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर होऊ द्या, मग बघू पण ही निवडणूक बिनविरोध होईल का नाही हे सांगता येणार नाही, असे विधान केले आहे. यावर भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही आमच्याकडून सर्वच विरोधी पक्षांना आग्रहाची विनंती करणार आहोत की, ही निवडणूक 8 महिन्यांसाठी होणार आहे आणि यासाठी शहराच्या जनतेला धारेवर धरायचे आणि सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा असे होऊ नये. बापट साहेबांचे 50 वर्षांचे काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी काकडे यांनी केले.
पक्ष ठरविणार भूमिका : आज विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत भूमिका मांडल्यावर काकडे यांनी आपली भूमिका मांडली. या पोटनिवडणुकीत देखील खासदार गिरीश बापट यांच्या घरात उमेदवारी द्यावी अशी चर्चा सुरू आहे. यावर काकडे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची भूमिका ही पक्ष ठरवत असतो. कोणीही एक व्यक्ती ठरवत नाही आणि भाजपमध्ये पाहिले सर्व्हे केला जाईल आणि त्यानंतर तो सर्व्हे केंद्राकडे पाठविण्यात येतो आणि मगच उमेदवार ठरवला जातो. घरापेक्षा सर्व्हेमध्ये जी व्यक्ती येईल त्या व्यक्तीचेच नाव दिल्लीतील पक्षाचे वरिष्ठ अंतिमत: ठरवतील, असे देखील यावेळी संजय काकडे म्हणाले.