PM Modi Mumbai Visit : भ्रष्टाचार पूर्ण नष्ट करा! मोदींच्या सभेनंतर कार्यकर्त्यांच्या भावना - पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील ४० हजार कोटी विकास कामांचा भूमिपूजन, लोकार्पण गुरूवारी करण्यात आले. या प्रसंगी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थतीत भ्रष्टाचाराला थारा देताना कामा नये असे मुंबईकरांना उद्देशून सांगितले. त्याचप्रमाणे मागील काही काळापासून ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार झाला आहे, यापुढे तसा होता कामा नये व छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ते होणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. मोदींच्या सभेनंतर तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी खास बातचीत केली आहे. जाणून घेऊया कार्यकर्त्यांशी काय आहे मत. मोदींच्या सभेनंतर कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यावेळी त्यांनी सांगितले की, मागच्या अडीच वर्षात जी कामे झाले नाही ते काम शिंदे फडणवीस सरकारच्या काळाच सहा महिन्यात पुर्ण झाले आहे. तसेच येणाऱ्या काळात आणखी विकास होईल आणि मुंबई ही एक सुदंर मुंबई होईल असे मत त्यांनी व्यक्त केली.
मुंबईकरांची मने जिंकण्याचा प्रयत्न : सभेदरम्यानपंतप्रधान मोदी यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात न पडता थेट विकासाचे स्वप्न दाखवत मुंबईकरांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देत मुंबईकरांनी सत्ता द्यायला हवी, असे आवाहन करीत पंतप्रधानांनी आगामी महापालिका निवडणूकीच्या प्रचाराला जणू सुरूवातच केली होती.
मुंबईकरांना पैसा कमी पडू देणार नाही : मुंबईच्या विकासकामांसाठी डबल इंजिन सरकार नक्कीच मेहनत घेईल त्यासाठी मुंबईत भाजपा शिंदे गटाची सत्ता असायला हवी असे म्हणत महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंगच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने फुंकले आहे. भाजप आणि एनडीए कधीही विकास कामांना ब्रेक लावत नाही मात्र गेल्या काही काळात विकास कामांना ब्रेक लावला गेला मुंबईतील छोटे व्यावसायिक फेरीवाले यांच्यासाठी असलेला स्वनिधी तत्कालीन सरकारने रोखला होता आणि म्हणूनच सव्वा लाख लाभार्थी त्यापासून वंचित राहिले असा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला.
नाव न घेता ठाकरे कुटुंबीयांवर टीका : पंतप्रधानांनी आपल्या विकासाच्या मुद्द्यावर भाषणाचा रोख ठेवला असला तरी अधून-मधून महाविकास आघाडी सरकार आणि ठाकरे कुटुंबीयांवर नाव न घेता त्यांनी प्रहार केले. ठाकरे कुटुंबीयांचे नाव न घेऊन त्यांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न करीत दुसरीकडे विकासाचे काम रोखण्याची प्रवृत्ती असेल तर मुंबईचे भविष्य कसे उज्वल होईल असा टोलाही त्यांनी लगावला.