Sinhagad : पुण्यातील सिंहगडावर गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, 50 पर्यटक जखमी - पुण्यातील सिंहगड
पुणे : रविवारी शहरातील पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. किल्ले सिंहगडावर देखील सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. काल रविवार असल्याने किल्ले सिंहगडावर मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात 50 पर्यटक जखमी झाले आहेत. मधमाशांनी हल्ला केल्याने पर्यटकांची मोठी धावपळ उडाली होती. मधमाशांच्या या हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले आहेत. गडावरील पुणे दरवाजापासून पुढे मधमाशा घोंगावत असतात. सुट्टीच्या दिवशी सरासरी 5 ते 10 हजार पर्यटक या किल्ल्यावर येत असतात. तरीही पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने कोणत्याही उपाययोजना केलेली नाही. किल्ले सिंहगडावर आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कोणतीही यंत्रणा कार्यरत नाही. मधमाशांचा हल्ला, दरड कोसळणे किंवा इतर दुर्घटना घडल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी कोणतीही व्यवस्था किल्ले सिंहगडावर नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.