फुग्याच्या सिलेंडरचा स्फोट,चिमुकल्याचा मृत्यू तर दोन जखमी - सिलेंडरचा स्फोट
Published : Dec 25, 2023, 1:03 PM IST
नागपूर : नागपूर शहरातील सदर पोलीस ठाणे हद्दीतील बिशप कॉटन ग्राउंड शाळेच्या मैदानासामोरचं फुगेवाला गॅसचे फुगे विकत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात एका चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. सिझान आसिफ शेख असं मृत चिमुकल्याचं नावं आहे. तर फारिया हबीब शेख आणि अनमता हबीब शेख अशी जखमींची नावं आहेत. त्या मृतक सिझानच्या मावशी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार एक फुगेवाला बिशप कॉटन शाळेसमोर फुगे विकत होता. अनमता आणि फारिया या सिझानला घेऊन फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी सिझानला फुगा घेऊन देण्यासाठी त्या फुगेवाल्याजवळ गेल्या असता अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत सिझानच्या डोक्याला गंभीर जखम झाली तर त्यांच्या दोन्ही मावशी देखील जखमी झाल्या. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी सिझानला तपासून मृत घोषित केलं. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर त्यात अनेक जण जखमी झाल्याचं बघून फुगे विक्रेत्याने तेथून पळ काढला. सदर पोलिसांनी फुगे विक्रेत्याच्या गाडीच्या नंबरवरून त्याचा शोध सुरू केलाय.