Ambadas Danve News: पुलवामा घटनेतील सैनिकांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार - अंबादास दानवे यांचा फडणवीस यांना टोला - सावरकर यांचा अपमान
अकोला : पुलवामा घटनेतील मृतक सैनिकांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार केंद्र सरकार करित आहे.अत्यंत दुर्दैवी ही बाब आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज दिली. पारस येथील बाबाजी महाराज संस्थान जेथे घडलेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी आले असता ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, ही फार मोठी दुर्घटना आहे. पालकमंत्र्यांनी यायला हवे होते. मी विरोधी पक्षनेता असून राज्यभर फिरत असतो. त्यामुळे सत्तापक्षातील नेते म्हणून त्यांनी येऊन येथील नागरिकांचे सांत्वन करणे आवश्यक होते, असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लावला. विजय वडेट्टीवार यांच्या मुलीने सावरकर यांच्याबद्दल जे बोलले त्याबद्दल काही बोलायचे नाही. कोणीही सावरकर यांच्याबद्दल बोलेल त्याला उत्तर देणे हे आम्हाला बंधनकारक नाही. परंतु, सावरकर यांचा अपमान आम्ही कदापी सहन करणार नाही, असेही दानवे म्हणाले. तसेच दुष्काळी शेतकरी यांना मदतीचे अजून पैसे मिळाले नाहीत. सप्टेंबर, ऑक्टोबरमधील नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही, राज्य सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, असेही ते म्हणाले. सरकार शेतकऱ्यांना मदत करीत नसल्याचे चित्र आहे. फक्त घोषणाबाजी करून शेतकऱ्यांना मदत दिली असे होत नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार हे सरकार करीत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला.