मी घेतलेली भूमिका बरोबर असल्यामुळंच 'इतक्या' आमदारांचा मला पाठिंबा; अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा - Ajit Pawar On Sharad Pawar
Published : Dec 24, 2023, 10:13 PM IST
बारामती (पुणे) Ajit Pawar On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ही बाब सध्या न्याय प्रक्रियेत आहे. मात्र, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामती दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर बोलताना थेट शरद पवारांवरच निशाणा साधला. तर वेगळी भूमिका घेतल्याच्या मुद्द्यावरून बोलताना अजित पवार म्हणाले की, याबाबतची भूमिका घेत असताना वर्षभर चर्चा चालू होत्या. जवळपास ५३ पैकी ४३ आमदार येतात, २ अपक्ष आमदार पाठिंबा देतात. विधान परिषदेचे ६ आमदार येतात, याचाच अर्थ मी घेतलेली भूमिका बरोबर आहे. म्हणूनच हे सर्व माझ्याबरोबर येतात. कोणालाही दमबाजी मी केली नाही.
शरद पवारांवर साधला निशाणा : काम करण्याचा प्रत्येकाचा एक काळ असतो. उमेदीचाही एक काळ असतो. आम्ही वरिष्ठांना सगळ्यांना सांगितलं. आतापर्यंत तुम्ही सांगाल ते ऐकत आलो. जिल्हा, तालुका राष्ट्रवादीमय कसा राहील, या सगळ्या गोष्टी करत आलो. १९६७ नवीन नेतृत्व या ठिकाणी आले. तेव्हा ते १७ हजारांनी निवडून आले, १९७२ साली ३४ हजारांनी निवडून आले. १९७८ ला १८ हजारांनी निवडून आले. १९८० ला २५ हजारांनी निवडून आले. ८५ ला विरोधक केवळ १८ हजारांनी पडले. १९९० ला माझ्यासारखे तरुण काम करू लागल्यावर १ लाखाने जागा निवडून आल्या. त्यानंतर आम्ही कधीच मागे बघितलं नाही. त्यानंतर सतत लाखांच्या पुढेच लिड गेलं, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला.