Sharad Pawar Resigns : साहेब निर्णय बदला; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र..... - राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच नेते मंडळी आणि राज्यभरातील कार्यकर्ते हे भावूक झाले आहेत. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा अशी भावना सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात येत आहे. तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी यांच्याकडून पवार यांची मनधरणी सुरू आहे. आता पवार यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. अश्यातच पुण्यात देखील कार्यकर्ते हे भावूक झाले आहेत. त्यांनी देखील पवारांकडे साकडे घातले आहे की, आपण हा निर्णय मागे घ्यावा. आमच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे, असे म्हणत कार्यकर्ते भावूक झाले आहे. तर पुण्यातील एका कार्यकर्त्याने तर चक्क स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून साहेब आपण निर्णय बदलावा असे म्हटले आहे. साहेब प्रतिष्ठान तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप काळे याने आपल्या स्वतः च्या रक्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. साहेब आपण घेतलेला हा निर्णय कोणालाच मान्य नसून आपल्या या निर्णयाने आम्ही पोरके झालो आहे, आपण आमचे दैवत असून आपण हा निर्णय बदलावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.