Abhijit Wanjari Demand : विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी मी इच्छुक; अभिजीत वंजारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी - अभिजीत वंजारी
नागपूर :सध्या राज्यात विचित्र राजकीय परिस्थिती आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडले. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. शरद पवार यांचे आमदार अजित पवारांच्या गटात गेले. आणखी काही आमदार जात आहेत. विधानपरिषदेचेही चार-पाच आमदार अजित पवारांच्या गटात गेले. त्यामुळे विधान परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. उद्धव ठाकरे गटातीलही आमदार शिंदे गटात गेले. म्हणून आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे आहेत. त्यामुळे विधान परिषदेत माझ्या नावाचा विचार झाला पाहिजे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मी विनंती केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अभिजीत वंजारी यांनी दिली आहे. तरुण चेहऱ्यांना संधी मिळाल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होईल, असा दावा त्यांनी केला आहे. 2024 मध्ये राज्यात सर्व निवडणुका होणार आहेत. या सर्व निवडणुकींना मार्गदर्शन करण्याकरिता नवे समीकरण तयार करण्याची गरज आहे. विधानसभेत पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा आणि विधानपरिषदेत मला संधी दिली तर विदर्भाला काम करण्याचा हुरूप येईल, असा तर्क अभिजीत वंजारी यांनी दिला आहे. पक्षाने माझा विचार केला तर मला आनंद होईल. मी यासंदर्भात नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांना विनंती केली आहे. विरोधी पक्ष नेता ही घटनात्मक तरतूद आहे. विरोधी पक्षनेते पद हे विरोधी बाकावर बसणाऱ्या सर्वाधिक आमदार असणाऱ्या पक्षाला मिळते. काँग्रेस पक्ष नेतृत्वाने लवकर निर्णय घ्यावा असे अभिजीत वंजारी म्हणाले आहेत.