MP Played Kabaddi : खासदार सुनील मेंढे उतरले कबड्डीच्या मैदानात.. कबड्डी.. कबड्डी.. म्हणत बाद केले तीन खेळाडू..
भंडारा : भंडारा- गोंदियाचे खासदार म्हणून नागरिक खासदार सुनील मेंढे ( MP Sunil Mendhe ) यांना ओळखत होते. मात्र शनिवारी रात्री चक्क कबड्डी खेळाडू म्हणून जेव्हा ते मैदानात उतरले तेव्हा प्रत्येकांना आश्चर्याचा धक्का पोहोचला. त्यातही त्यांनी तब्बल तीन खेळाडूंना बाद करत आपल्या टीमला जिंकविण्यात मोलाचे योगदान दिल्याने प्रेक्षकांनी खासदार मेंढे यांचे टाळ्यांच्या कडकडाटासह अभिनंदन ( MP Sunil Mendhe Played Kabaddi Match ) केले. कबड्डी खेळतानाचा त्यांचा हा व्हिडीओ भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील खेळाडूंना खेळाप्रती आकर्षण वाढावे आणि जास्तीत जास्त चांगले खेळाडू देशासाठी खेळावे यासाठी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. 26 फेब्रुवारीपासून या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, कबड्डी, नौकायन, शंकर पट, रस्सीखेच या सारख्या खेळाचे आयोजन केले गेले आहेत. खेळ अंगात भिनला असला की संधी मिळताच माणसातील खेळाडू डोकं वर काढतो. मग तो कुठल्याही पदावर का असेना.. खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने हा अनुभव आला. शालेय जीवनात उत्कृष्ट कबड्डीचे खेळाडू असलेले खासदार सुनील मेंढे स्वतः मैदानात उतरले आणि प्रतिस्पर्धी संघाच्या तीन खेळाडूंना बाद करून वयाच्या 53 व्या वर्षी जोश कायम असल्याचे दाखवून दिले. शनिवारी भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील टीमचा गोंदिया जिल्ह्याचा टीम बरोबर शेवटचा सामना होणार होता. प्रेक्षकांना या सामन्याची उत्कंठा होती. कारण मोहाडीची टीम बंगाल वारियर्सचा खेळाडू आकाश पिकलमुंडे यांची होती. हा खेळ पाहण्यासाठी खासदार सुनील मेंढेही उपस्थित होते. मात्र सामन्याच्या अगदी पाच मिनिटांपूर्वी खासदार सुनील मेंढे यांच्यातील जुना खेळाडू जागा झाला आणि वयाच्या 53 वर्षी त्यांनी सामनात खेळाडू म्हणून उतरण्याचे ठरवले. खासदार सुनील मेंढे यांनी टी शर्ट आणि हाफ पॅन्ट असा खेळाडूचा पोषाख घालून मैदानात उतरत सर्वांना आश्चर्यचकित केले. भंडारा आणि गोंदिया संघात सुरू असलेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात खासदार भंडारा संघाकडून मैदानात उतरले. गोंदिया संघावर चाल करून गेलेल्या खासदारांनी पहिल्याच प्रयत्नात एका गड्याला बाद केले. तर तिसऱ्या प्रयत्नात दोन गडी बाद करून आपल्या टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. अचानक राजकारणात येऊन नगराध्यक्ष ते खासदार म्हणून विजय संपादित करताना त्यांचे डावपेच राजकारणातील बड्या नेत्यांना धक्का देणारे होते. असाच सुखद धक्का त्यांनी आज एक खेळाडू म्हणून प्रेक्षकांना दिला.कधी काळी उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून ओळख असलेल्या खासदारांनी वयाच्या 53 व्या वर्षीही तोच जोश दाखवीत केलेले खेळाचे प्रदर्शन उपस्थित प्रेक्षकांनाही आश्चर्यचकित करून गेले. मैदानात उतरलेल्या खासदारांच्या कौतुकासाठी प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट केला. रविवारी या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप असून, समारोपाला अभिनेते मनोज तिवारी हे उपस्थित राहणार आहेत. या क्रीडा महोत्सवात ज्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली भविष्यात त्यांच्या सरावासाठी योग त्या सुविधा उपलब्ध करून देश पातळीवरील खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST