VIDEO : लडेंगें और जितेंगे, झुकेंगे नही; अटकेनंतर नवाब मलिकांची बॉडी लॅंग्वेज मोहिमेवर निघाल्यासारखी
मुंबई - मनी लाँड्रींग प्रकरणी ( money laundering case ) राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक ( Minister Nawab Malik arrested by ED ) करण्यात आली आहे. मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab Malik ) यांची आज ( बुधवारी ) सकाळपासूनच ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. आज पहाटेच ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील राहत्या घरी पोहोचले होते. तिथे काही वेळ नवाब मलिक यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांना 7.45 दरम्यान ईडी अधिकारी कार्यालयात घेऊन आले होते. चौकशीनंतर दुपारी त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात आले. यावेळी ईडी कार्यालयातून बाहेर येताना नवाब मलिक यांची बॉडी लॅंग्वेज ही एखाद्या मोहिमेवर निघाल्यासारखी होती. ईडी कार्यालयाबाहेर येताना त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही ताण दिसत नव्हता. बाहेर येताना त्यांनी आपल्या हाताची मुठ वळवत दोनदा हात उंचावला आणि उपस्थितांना अभिवादन केले. चेहऱ्यावर कोणतेही त्रासिक भाव न आणता हसत - हसत, हात हालवत ते बाहेर आले. मलिकांनी त्याचवेळी माध्यम प्रतिनिधींकडे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना गाडीचे दिशेने नेले. आणि त्यांना वाहनात बसवण्यात आले. यावेळी त्यांनी वाहनातून "लडेंगे और जितेंगे, लडेंगे और जितेंगे, झुकेंगे नही" अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST