फळांच्या राजासाठी सामान्यांना करावी लागणार एक महिन्याची प्रतीक्षा
मुंबई - नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात फळांचा राजा असलेल्या आंब्याची आवक काहीप्रमाणात वाढली असून रोज १२ ते १३ हजार आंब्याच्या पेट्या दाखल होत आहेत. यंदा आंब्याचा हंगाम हा जानेवारीपासूनच सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होईल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांना होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि अति थंडीमुळे आंबे गळून पडल्याने आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली होती. आता काही प्रमाणात आवक वाढली असली तरी आंब्याचे ठोक दर पेटीमागे २ हजार ते ५ हजार रूपयांपर्यंत आहेत. २० एप्रिलनंतर आंब्याची आवक वाढण्याची शक्यता असून ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल इतक्या दरात आंबा उपलब्ध होणार आहे. सध्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातून आंब्याची आवक होत असून पुढील महिन्यापासून दक्षिण भारतासह गुजरातमधूनही आंब्याची आवक येण्यास सुरुवात होईल, अशी माहिती एपीएमसी फळ बाजाराचे संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST