Leopard Fell In Well : जालन्यात विहिरीत पडला बिबट्या; वन विभागाने केले रेस्क्यू ऑपरेशन, पाहा Video - leopard fell into the burning well
जालना - जिल्ह्यात जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी परिसरातील खल्याणगव्हण येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरुप बाहेर काढण्यास सपोनि ठाकरे व वनविभागाला ( Jalna Forest Department ) यश आले आहे. रात्रीच्या वेळी अंधारात विहिरीचा अंदाज न आल्यामुळे दीड वर्षाचा नर बिबट्या विहिरीत पडला होता. सकाळी 8.30 च्या सुमारास सुखदेव बनकर हे शेतात गेल्यानंतर त्यांना शेतातील विहीरीतून आवाज येत असल्याचे जाणवले. त्यावेळी त्यांनी कशाचा आवाज येतो याचा अंदाज घेण्यासाठी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीत एका कपारीला बिबट्या बसलेला दिसला. त्यांनी तात्काळ वनविभागाला फोन करून विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती दिली. विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरल्याने बिबट्या बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी आवश्यक असलेला पिंजरा आणण्यासाठी तीन तासाचा अवधी गेला. पिंजरा आल्यानंतर काही तासाच्या परिश्रमानंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. याकामी उपस्थित खल्याणगव्हण नागरिकांची मोठी मदत झाल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आल्या असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST