कोल्हापूरातील जाधव कुटुंबाने केली गायीची ओटीभरणी - कोल्हापूरात गायीची ओटीभरणी
कोल्हापूर - शेतीला जोड व्यवसाय म्हणून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी दूध उत्पादनाचा व्यवसाय करतात. जिल्ह्यात सर्रास प्रत्येकाच्या घरात गायी, म्हशी पाहायला मिळतात. आपल्या प्राण्यांची कुटुंबातील एखाद्या सदस्यांप्रमाणेच ते काळजी घेत असतात. कोल्हापूरातल्या पन्हाळा तालुक्यातील गोलीवडेमधील सुशांत संजय जाधव यांच्या कुटुंबात प्राण्यांचे एक वेगळे स्थान आहे. त्यामुळे त्यांनी व त्यांच्या पत्निने आपल्या खिलार जातीच्या गायीच्या ओटीभरणीचा कार्यक्रम साजरा केला आहे. त्यांनी अगदी महिलांचा ओटीभरणी कार्यक्रम असतो, तसा कार्यक्रम साजरा केला. सुशांत जाधव आणि त्यांच्या पत्नी कोमल जाधव यांनी आपल्या गायीच्या ओटीभरणीचा कार्यक्रम नेहमी लक्षात रहावा यासाठी एका फोटोग्राफरला बोलवले. फोटोत आपली गाय देखणी दिसावी यासाठी मोगऱ्याचा गजरा, गळ्यात हार आणि दोन्ही शिंगांना लाल रंगाचा रिबीन बांधून तिला सजविण्यात आले. शिवाय नव्या कोऱ्या हिरव्यागार सहा वार साडीने गायीच्या ओटीभरणीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गावातल्या बहुतांश महिलांनी सुद्धा हजेरी लावली होती. त्यामुळे आपल्या गायीप्रती व्यक्त केलेल्या या प्रेमाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.