VIDEO : सेना आमदाराचे ग्रामसेवकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, 22 हजार ग्रामसेवक आक्रमक - etv bharat live
औरंगाबाद - शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे. औरंगाबाद येथे सरपंच परिषदेत बोलताना शिवसेना आमदाराची घसरली जीभ आणि त्यांनी ग्रामसेवकाबद्दल वादग्रस्त विधान केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.औरंगाबादच्या तापडिया नाट्य मंदिरात महिला सरपंच मेळावा घेण्यात आला. यामध्ये बोलताना शिवसेना आमदार संजय शिरसाठ म्हणाले की, 'एक सांगतो कधी ग्रामसेवकाच्या नादी लागू नका, कारण सगळ्यात भामटा ग्रामसेवक असतो, तो कधी मूर्ख बनवेल सांगता येत नाही' असे विधान शिरसाठ यांनी केलं आहे. हे वक्तव्य केल्यावर मात्र काही वेळात संजय शिरसाठ यांनी सावध भूमिका घेतली. मी काही चुकीचं बोललो नाही. राज्यातील काही ग्रामसेवक असे असतात मात्र मी सर्व ग्रामसेवकांबद्दल असं वक्तव्य केले नाही. अस ते म्हणाले. आमदार संजय शिरसाठ यांच्या विधानामुळे ग्रामसेवकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, राज्यभर काम बंद केले आहे. शिरसाठ यांच्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे 22 हजार ग्रामसेवकांनी राज्यभर आंदोलन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ताकीद द्यावी, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे, शिरसाठ यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी केली आहे.