झरे गावाला पोलिसांचा वेढा, बैलगाडी शर्यत होणार का याकडे सर्वांचे लक्ष
सांगली - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी 20 ऑगस्टला रे याठिकाणी बैलगाडी शर्यत आयोजित केली आहे. यावरुन प्रशासन विरुद्ध पडळकर, असा संघर्ष निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. आसपासच्या गावाला आता पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालेला आहे. झरेकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे जवळपास झरेच्या आसपास असणाऱ्या गावांमध्ये पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाला आहे. मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून पडळकर यांनी तयार केलेला बैलगाडी शर्यतीचे मैदानही ऊकरून टाकण्यात आले आहे. प्रशासनाकडून बैलगाडी शर्यत घेऊ नये ,यासाठी आमदार पडळकर यांना नोटीसही बजावली आहे. प्रशासनाकडून बैलगाडी शर्यत होऊ देणार नसल्याचा निर्धार करण्यात आला आहे. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर यांनीही कोणत्याही परिस्थितीमध्ये बैलगाडी शर्यती होणारच,अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आता शुक्रवारी (दि. 20 ऑगस्ट) बैलगाडीच्या शर्यती होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परिस्थितीचा आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी