मुंबईत 227 वार्डमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी सुरू
मुंबई - राज्यात कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता लसीकरण मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. राज्यात १ मेपासून 18 वर्षावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. यासाठी मुंबई मध्ये देखील जोरदार तयारी केल्याचं सांगितले जाते. मुंबईच्या 227 वार्डमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याच्या सूचना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्या होत्या. या सूचनांनुसार आपण तयारी करत असल्याचं मुंबईतल्या वार्डच्या प्रभाग समिती अध्यक्षांनी सांगितले आहे. तसेच १ मेपासून लसीकरण सुरू होत आहे. या दृष्टीनं मुंबईत 227 वॉर्ड मध्ये पालिकेचे सहाय्यक आयुक्त वार्डची पाहणी करत आहेत. सामाजिक हॉल, शाळा यांची पाहणी केली जात आहे. तसेच लसीकरण केंद्राच्या जवळ एखादे हेल्थ पोस्ट आहे का? याची पाहणी केली जात आहे. प्रत्येक केंद्रावर एक ॲम्बुलन्स ठेवण्याच्या देखील सूचना केल्या जात आहेत. प्रभात समिती अध्यक्ष रामदास कांबळे सांगतात की, मी माझ्या स्वतःच्या वॉर्ड मध्ये समाज मंदिर हॉल चा प्रस्ताव पालिकेकडे पाठवला आहे तो विचाराधीन आहे.