आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी - लोणावळा
लोणावळा - नवरात्रोत्सवानिमित्त आई एकविराच्या दर्शनासाठी कार्ला गडावर भाविकांनी तुडुंब गर्दी केली आहे. नागरिकांना करोनाचा विसर पडला आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. आई एकविरा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुलदैवत असून घटनस्थापनेचा मुहूर्त साधून महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्यात आली. मात्र, ऐन नवरात्रोत्सवात एकविरेचे मंदिर खुले केल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकविरा देवीचे मंदिर भाविकांसाठी बंद होते. मात्र, ठाकरे सरकारने भक्तांचे गाऱ्हाणे ऐकत घटनस्थापनेच्या दिवशी मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ऐन नवरात्रोत्सवात मंदिरे उघडण्यात आली. त्यामुळं लोणावळ्यातील आई एकविरेच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच, परिसरात काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. रविवार असल्याने भाविकांची रीघ लागल्याचे पाहायला मिळाले. तर, दुसरीकडे सध्याचे चित्र पाहून नागरिकांमधील करोनाची भीती कमी झाली आहे.