अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा बांधकाम क्षेत्राबाबत महत्त्वाचा निर्णय; व्यवसायिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया - mumbai builders news
मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी 'आत्मनिर्भर भारत' अभियानाअंतर्गत बांधकाम क्षेत्राला आज मोठा दिलासा दिला आहे. देशातील रेरा नोंदणी असलेल्या सर्व गृहप्रकल्पांना पूर्णत्वासाठी थेट सहा महिन्याची मुदतवाढ त्यांनी दिली आहे. तसेच इतरही काही तरतुदीमुळे या क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचे सांगत काही बिल्डरांनी नव्या घोषणेबद्दल समाधान व्यक्त केले. तर काही बिल्डरांनी मात्र थेट आर्थिक पॅकेज न दिल्याने थोडी नाराजी व्यक्त केली आहे. 'केंद्राने आज सहा महिन्यांची मुदतवाढ देत भीती आणि ताण दूर' केल्याचे म्हणत बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रवक्ते आनंद गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर, 'बांधकाम क्षेत्राला थेट कोणतेही आर्थिक पॅकेज न दिल्याने' एमसीएचआय-क्रेडायचे सदस्य आणि प्रजापती समूहाचे सर्वेसर्वा राजेश प्रजापती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.