Video: कोळी बांधवांनी दर्या किनारी उत्साहात साजरी केली नारळी पौर्णिमा
मुंबई - श्रावण महिन्यातील पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा. हा सण महाराष्ट्रातील कोळी बांधव मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करत असतात. महत्त्वाचे म्हणजे मान्सून सुरू झाल्यानंतर समुद्रातील मासेमारी पूर्णतः बंद असते. श्रावण महिना आणि त्यातल्या पौर्णिमेला सर्व कोळी बांधव समुद्र किनारी एकवटतात आणि उधाणलेल्या दर्याला शांत होण्याची प्रार्थना करतात. कारण, कोळी बांधवांचा उदरनिर्वाह हा समुद्रावर अवलंबून आहे. याच दिवशी कोळी बांधव श्रीफळ दर्याला अर्पण करतो. वाजत-गाजत मिरवणूक काढत, कोळी बांधव समुद्रकिनारी पोहोचतात आणि दर्याला नारळ अर्पण करतात. तसेच दर्याला शांत होण्याची प्रार्थनाही करतात. या सणाच्या दुसऱ्या दिवशी कोळी बांधव पुन्हा एकदा समुद्रात आपल्या बोटी घेऊन निघतात आणि मासेमारीला सुरुवात करतात. याच दिवशी कोळी बांधवांच्या घरी नारळाच्या वड्या आणि नारळी भात केला जातो. एकमेकांना घरी बोलावून गोडधोड खाऊ घातले जाते. तसेच कोळीवाडा परिसरात नारळ फोडीच्या स्पर्धाही रंगतात.