खेळाला केले अभ्यास, विद्यार्थिनीने दिले हजार शिक्षकांना धडे; डायना, मायक्रोसॉफ्टकडून सन्मानित
लुधियाना (पंजाब) - आज अनेकजण रट्टामार अभ्यास करतात. अनेकांना अभ्यास करणे जड वाटते, मात्र हसत खेळत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे याचा धडा पंजाबमधील अवघ्या 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने घालून दिला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे पंजाब राज्यातील लुधियानाची रहिवासी असलेल्या 14 वर्षीय नम्या जोशीने मांडले आहे. होय.... वयाच्या 14 व्या वर्षी नम्या 1000 हून अधिक शिक्षकांना नाटकातून आपल्या विद्यार्थ्यांना सहज कसे शिकवता येईल हे शिकवत आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल 2020 मध्ये नम्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले. नुकतेच केंब्रिज विद्यापीठानेही नम्याला डायना पुरस्काराने गौरवले आहे. राजकुमारी डायना यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार 9 ते 25 वर्षे वयोगटातील लोकांना देण्यात आला. ज्यांनी समाजाच्या विकासासाठी हातभार लावला आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. तसेच, जगातील प्रसिद्ध असलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सत्या नडेला यांच्या हस्तेही नम्याचा गौरव करण्यात आला आहे.