Kolhapur Rains: पन्हाळा रस्ता खचून गेला वाहून; वाहतूक बंद - कोल्हापूर पाऊस अपडेट
कोल्हापूर - जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. जिल्ह्यातील अनेक वाहतूक मार्गावर पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. कोल्हापूरातील पन्हाळा गडावर जाणारा रस्ता सुद्धा खचून वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 111 बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीची पाणीपातळी 47.5 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे महापुराचा धोका वाढतच चालला आहे. गारगोटीकडून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या मार्गावरील पालघाट याठिकाणी अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्या आहेत. त्याचप्रमाणे पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे दगड-धोंडे, खडक घाटातील रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद झालेला आहे. डोंगरातील पाण्याचे मोठे लोंढे घाटातील रस्त्यावर आडवे वाहत आहेत. गारगोटी - कोल्हापूर, गारगोटी-गडहिंग्लज, गारगोटी -कडगाव हे सर्व मार्ग बंद झाले. गारगोटीचा कोल्हापूर जिल्ह्यातील इतर भागाशी संपर्क खंडित झाला आहे. आंबेओहोळ धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. धरण ८८ टक्के भरले असून, धरणाच्या सांडव्यावरुन विसर्ग ७५० क्युसेक्सने सुरू झाला आहे. त्यामुळे आंबेओहोळ नाला व हिरण्यकेशी नदीकाठच्या ग्रामस्थांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.