पाचवीत शिकणाऱ्या सोनूचे बाणेदार भाषण झाले व्हायरल, राजकारण्यांवर कडाडली चिमुकली - सोनू घोनमोडेचे भाषण
भंडारा - जिल्ह्याच्या खराशी या गावातील जिल्हा परिषद डिजीटल पब्लिक स्कूल मध्यल्या इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या सोनू घोनमोडे या विद्यार्थिनीने स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी शाळेत दिलेले भाषण हे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. भाषण करतानाचा सोनूचे भाषेवरील प्रभुत्व आणि तिचा आत्मविश्वास हा प्रत्येकाला भुरळ घालणारा आहे. तिच्या या भाषणातील बाणेदारपणा ती ज्या परिस्थितीवर भाष्य करते ते चित्रण प्रत्येकाच्या डोळ्यापुढे उभे राहते. सोनू ज्या आत्मविश्वासाने भाषण देते, ते मोठमोठ्या नेत्यांना आणि वक्त्यांनांही लाजवेल अशा ठेक्यात आणि सहजतेने देत आहे. शब्दांवर, भाषेवर आणि संवाद फेक करण्यावर तिची पकड तिच्या ओघवती वाणीतून दिसून येते. प्रत्येक शब्दातील तिचा आत्मविश्वास, शब्दानुसार आवाजाचे चढ-उतार या प्रत्येक गोष्टी तिच्या वयातील किंवा तिच्या पेक्षा मोठ्या वयातील विद्यार्थ्यांना शिकण्याजोग्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत शिकणारी सोनू घोनमोडे ही लाखनी तालुक्यातील मचारणा या छोट्याशा गावातील मुलगी आहे. आठ किलोमीटर अंतरावरील खराशी येथील शाळेत इयत्ता पाचवी वर्गात शिकते. वडील उच्च शिक्षित असून वडिलांचे किराणा दुकान आहे. सोनूचे वक्तृत्व चांगले आहे हे तिच्या वडिलांनी हेरले. वकृत्व मार्गदर्शनाचा तिने ऑनलाइन क्लास केला आणि या वर्षी तिच्या वडिलांनी मार्गदर्शन केलेले भाषण तिने खराशीच्या शाळेत सादर केले. तिचे हे भाषण समोरच्या प्रेक्षकांना केवळ खिळवून ठेवणारे नाही तर, त्यांना विचार करायला आणि त्यावर कृती करायला भाग पाडणारे आहे. तिच्या भाषणात तिने राजकीय स्वार्थासाठी देशाचे आणि जनते नुकसान करणाऱ्या राजकारण्यांवर कडाडून ताशेरे ओढले आहेत.