अमरावतीत रसायन कारखान्यात अग्नितांडव
अमरावती : अमरावती एमआयडीसी परिसरातील नॅशनल पेट्रीसाईज अँड केमिकल या रसायन निर्मीती कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी समोर आली. मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली ही आग अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अमरावती महापालिकेसह जिल्ह्यातील 14 नगर परिषदेतील अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले होते. आगीची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री यशोमती ठाकूर, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. आग लागलेल्या कारखान्याच्या जवळच ऑक्सिजन प्लांट आहे. त्याच्या सुरक्षेसह फायर ऑडिटबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. दरम्यान, आगीमुळे कारखान्याच्या इमारतीला भेगा पडल्या असून ही इमारत कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कंपनीत शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक उत्पादनांची निर्मिती केली जाते. या कारखान्यात शंभरच्या आसपास कामगार काम करतात. सकळी 9.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत या कारखान्यात काम चालतं. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता कारखाना बंद झाला होता. मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास या कारखनायला आग लागल्याची माहिती आहे.