सिल्लोड तालुक्यात शेतकरी विकतोय आलिशान गाडीतून टरबूज - शेतकऱ्या बद्दल बातमी
सध्या सर्वत्र लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे आलिशान गाडीतून शेतकरी टरबूज विकत आहे. 'एकरी 35000 रुपये खर्च करून टरबूज पिकाची लागवड' - सध्या लॉकडाऊमुळे अनेक उद्योगधंद्यावर याचा मोठा परिणाम झाला आहे. परिणामी बाजारपेठ ही बंद असल्याने कित्येक जणांवर उपासमारीची वेळ देखील आली आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीमध्ये एकरी 35000 रुपये खर्च करून टरबूज पिकाची लागवड केली होती. या पिकाच्या लागवडीने आपल्या हातात दोन पैसे जास्त मिळतील व नगदी पैसे मिळवून देणाऱ्या या पिकापासून आपल्याला चांगले उत्पन्न होईल ही आशा उराशी बाळगून त्यांनी टरबूज पिकाची लागवड केली होती. मात्र, परिसरातील बाजारपेठा बंद असल्याने या शेतकऱ्याने घाटनांद्रा येथे आपल्या आलिशान गाडीमध्ये टरबूज विक्रीसाठी आणले. बारा लाख रुपये किंमतीच्या आलिशान गाडीत टरबूज विक्रीसाठी आले असल्याने सर्वजन या गाडीकडे कुतुहलाने पाहत होते. टरबूजाची विक्री केवळ दहा रुपये प्रतिनग या दराने करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. 'शेतकऱ्यावर दुर्दैवी वेळ' - कोरोणा लॉकडाऊनमुळे सर्वच बंद असल्याने व बाजारपेठेत भावही चांगला मिळत नसल्याने भाड्याचे वाहन करुन गावोगावी जाऊन टरबूजाची विक्री करणे परवडत नाही. त्यामुळे घरी उभी असलेली बारा लाख रुपये किंमतीच्या आलिशान गाडीत टरबूज विकण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.