नवरात्र स्पेशल - महिषासुरावर विजय मिळवणारी 'चंद्रघंटा देवी'
पुणे - एकदा देवता आणि असुरांमध्ये दीर्घकाळ युद्ध चालू होते. असुरांचा स्वामी महिषासुर होता आणि देवतांच्या बाजूने इंद्रदेव नेतृत्व करत होते. महिषासुराने देवतांवर विजय मिळवून इंद्राचे सिंहासन बळकावले आणि तो स्वर्गलोकावर राज्य करू लागला. यामुळे सर्व देवता हैराण झाल्या आणि ब्रह्म, विष्णू आणि शंकर या त्रिदेवांकडे गेले. देवतांनी सांगितले की महिषासुराने इंद्र, चंद्र, सूर्य, वायू आणि अग्नी या सर्व देवतांचे अधिकार हिरावून घेतले आहेत आणि त्यांना कैद करून तो स्वर्गलोकाचा राजा झाला आहे. हे ऐकून त्रिदेव संतप्त झाले आणि त्या क्रोधातून त्यांच्या मुखातून ऊर्जा उत्पन्न झाली. देवगणांच्या शरीरातली ऊर्जाही या ऊर्जेला जाऊन मिळाली आणि दशदिशांना पसरू लागली. त्यावेळी तिथे एक देवी अवतरली. भगवान शंकराने या देवीला त्रिशूळ, भगवान विष्णूने चक्र प्रदान केले. अशाप्रकारे इतर देवतांनीही या देवीच्या हातात आपापली शस्त्रास्त्रे दिली. इंद्रानेही आपले वज्र आणि आपला हत्ती ऐरावताच्या अंगावरील एक घंटा उतरवून तिला दिली. सूर्याने आपले तेज आणि तलवार दिली आणि वाहन म्हणून वाघ दिला. देवीचे इतके महाकाय रूप पाहून महिषासुर घाबरला आणि त्याने आपल्या सेनेला हल्ला करण्याचा आदेश दिला. इतर दैत्य आणि दानवही युद्धात उतरले. देवीने एका झटक्यात महिषासुराचा संहार केला.