आळंदीकरांनी रक्तदानातून दिली संजीवनी - पिंपरी चिंचवड ब्लड बँक
पुणे - कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. या कठीण काळाचे महत्त्व लक्षात घेऊन आळंदी पोलीस स्टेशन आणि ‘पिंपरी चिंचवड ब्लड बँक’ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी 09 ते सायंकाळी 06 दरम्यान फ्रुटवली धर्मशाळा वडगाव रोड येथे, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सद्यस्थिती पाहता जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन ‘आळंदी पोलीस’ आणि आळंदी नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले होते. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद देत 400 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी पिंपरी चिंचवड ब्लड बँक डोनर कार्ड देऊन दात्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासह पोलीस खात्यातील अनेक अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी सॅनिटायझरची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रशासन व सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करीत विशेष काळजी घेण्यात आली. हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आळंदी पोलीस निरीक्षक साबळे व त्यांचा सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.