अंबालात आहे 'ऑक्सिजनची पूर्ती' करणारे घर
कोरोनाच्या संकटात एकीकडे संपूर्ण देश ऑक्सिजन तुटवड्यामुळे त्रस्त असताना अंबालामध्ये एका व्यक्तीनं आपल्या घरात आणि घराबाहेर ऑक्सिजन देणारी झाडं लावली आहेत. हे वास्तविक चित्र तुम्हाला अंबाला येथील मनाली हाऊसमध्ये राहणाऱ्या 78 वर्षीय प्राध्यापक वेद प्रकाश विज यांच्या घरी बघायला मिळेल. त्यांचे संपूर्ण घर झाडं आणि वनस्पतींनी अगदी खच्चून भरले आहे. प्राध्यापक वेद प्रकाश यांनी त्यांच्या घरी १००० हून अधिक कुड्यांमध्ये विविध प्रकारच्या शेकडो वनस्पतींची लागवड केली आहे. त्यांचे 3 मजली घर झाडांनी अक्षरशः खच्चून भरले आहे. प्राध्यापक वेद प्रकाश सांगतात की, त्यांच्या गुरूंनी त्यांना 1982 मध्ये एक फुलाचं झाड दिले होते. तेव्हापासून त्यांना झाडं लावण्याचा छंद जडला. 40 वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यानंतर 2004 मध्ये ते निवृत्त झाले आणि तेव्हापासून ते फक्त घरातच राहून झाडांची काळजी घेत आहेत.