अनेक आजारांवर गुणकारी छत्तीसगडमधील प्रसिद्ध 'चापडा चटणी' - red ants chutney news
जगदलपूर (छत्तीसगड) - लाल मुंग्यांची चटणी हा छत्तीसगडच्या बस्तर भागातील आदिवासी लोकांच्या आहारातील एक प्रमुख घटक आहे. ही चटणी अनेक आजारांवर उपायकारक असून छत्तीसगडसह इतर राज्यातही ही चटणी विशेष प्रसिद्ध आहे. स्थानिक भाषेत याला चापडा किंवा चपोडा चटणी म्हटले जाते. देश-विदेशातील पर्यटक बस्तरच्या पर्यटनावर आल्यास त्यांना ही चटणी जेवनात आवर्जून वाढली जाते. त्यामुळेच, जगदलपूर शहरातील अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये या चटणीला भरपूर मागणी आहे. ही चटणी इतकी प्रसिद्घ आहे, की इंग्लँडचा जगप्रसिद्ध सेलिब्रेटी शेफ गॉर्डन रामसे भारताच्या दौऱ्यावर आला असताना त्याने ही चटणी चाखली आणि तो त्याच्या प्रेमातच पडला. यानंतर त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय मेनूमध्येही या चटणीला स्थान दिले आहे.