ही आहे मुस्लीम समाजातील पहिली महिला 'यक्षगान कलाकार' - Yakshagana traditional dance form
मंगळुरू (कर्नाटक) : यक्षगान हे कर्नाटकमधील एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे. या माध्यमातून अनेक पौराणीक कथांचे विविध वेशभुषेसह सादरीकरण केले जाते. ही कला आधी फक्त पुरुष सादर करायचे मात्र, हळूहळू यात महिलांचा सहभागही वाढू लागला आहे. रामायण, महाभारतातील अनेक हिंदू पौराणीक कथेतील पात्र या माध्यमातून साकारले जातात. मात्र, दक्षिण कन्नडच्या ओकेथूरमधील अर्शियाने धर्म, जातीच्या पल्याड जाऊन या कलेची आवड जोपासली. तिने लहानपणी देवी महात्म हे नाटक पाहिले होते. यामध्ये महिषासुराच्या भूमिकेने तिचे विशेष लक्ष वेधले आणि आपणही अशाप्रकारचे एखादे पात्र साकारावे, असे तिने ठरवले. आज अर्शियाला मुस्लिम समाजातील पहिली महिला यक्षगान कलाकार म्हणून ओळखले जात असून ती महिषासुराच्या भूमिकेसाठी विशेष प्रसिद्ध आहे.