नवी दिल्ली : पुरेशी झोप घेणे हा उत्तम आरोग्याचा एक मूलभूत पैलू आहे. मात्र 30 टक्क्यांहून अधिक नागरिकांना निद्रानाशाचा त्रास होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांमध्ये तर ही समस्या तब्बल 40 ते 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. झोपेच्या समस्येने ग्रस्त असलेल्या नागरिकांची संख्या देशात मोठी आहे. इतकेच नाही, तर झोपेच्या समस्येने ग्रस्त असलेल्या यादीत भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश असल्याचा दावाही संशोधकांनी केला आहे.
भारतातील 28.8 दशलक्ष लोकांना स्लीप एपनियाचा धोका :अनेक भारतीय नागरिक स्लीप एपनिया या आजाराने ग्रस्त आहेत. लॅन्सेटच्या अभ्यासानुसार 30 ते 69 वयोगटातील अंदाजे 5.4 टक्के भारतीयांना या आजाराने ग्रासल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. यात 28.8 दशलक्ष नागरिकांना स्लीप एपनियाचा मध्यम किंवा गंभीर धोका आहे. तो प्रचलित झोपेचा विकार आहे. कमी झोपेमुळे लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, नैराश्य, कमी रोगप्रतिकारक शक्ती यासह अनेक आरोग्याच्या समस्या होत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
कमी झोपेमुळे जुनाट आजारांचा त्रास :कमी झोपेमुळे अनेक प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. यात झोपेची कमतरता आणि अकाली वृद्धत्व, मल्टिपल स्क्लेरोसिस आणि किडनी रोग यासारख्या जुनाट आजारांचा परस्परसंबंध देखील दर्शविला आहे. निद्रानाश असलेल्या व्यक्तींनी औषधांवर अवलंबून राहणे टाळले पाहिजे. त्याऐवजी जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. नैराश्य हे निद्रानाशाचे मूळ कारण असू शकते. चांगल्या झोपेला प्रोत्साहन देण्यासाठी उपचार आणि विश्रांती गरजेची आहे.
योग आणि निसर्गोपचार पडू शकतात उपयोगी :चांगल्या झोपेसाठी रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास अगोदर करावे. आपल्या आहारात सहज पचणारे पदार्थ समाविष्ट करावेत. जड जेवण केल्याने झोपेची गुणवत्ता कमी होऊन पचनास अडथळा येतो. लवकर नाश्ता करणे फायदेशीर असल्याचेही या संशोधनातून पुढे आले आहे. उशिरा जेवल्याने अॅसिड रिफ्लक्स आणि अॅसिडिटीचा धोका वाढतो. संध्याकाळी मद्य पिणे टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे चांगली झोप घेण्यासाठी योग आणि निसर्गोपचार गरजेचा असल्याचेही या संशोधनातून स्पष्ट करण्यात आले आहे.