हैदराबाद World Toilet Day 2023 : कोणत्याही मोकळ्या जागेत शौचास जाणं म्हणजे संसर्गजन्य आणि गंभीर आजारांना आमंत्रण देण्यासारखं आहे. मात्र आजही ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणं ही सर्वसाधारण बाब असल्याचं दिसून येते. अशीच स्थिती जागतिक पातळीवरसुद्धा आहे. त्यामुळे शौचालयाबाबत जनजागृती करण्यासाठी 19 नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात येतो. उघड्यावर शौचास बंदी घालणं आणि मूलभूत आरोग्याच्या गरजा पुरवणं हा या दिनाचा मुख्य हेतू आहे.
काय आहे जागतिक शौचालय दिनाचा इतिहास : जागतिक पातळीवर शौचालयाच्या बाबतीत प्राध्यान्य देण्यासाठी जॅक सिम यांनी 19 मे 2001 मध्ये वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन या संस्थेची स्थापना केली. जॅक सिम यांनी केलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची जागतिक पातळीवर चांगलीच प्रशंसा करण्यात येत होती. जॅक सिम यांनी स्थापना केलेल्या वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशनच्या कार्याची दखल घेऊन संयुक्त संघटनेनं 2013 मध्ये जागतिक शौचालय दिन घोषित केला. त्यामुळे वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन आणि सिंगापूर सरकारनं त्याचवर्षी आयोजित सिंगापूरमध्ये यूएन ठरावाचं नेतृत्व केलं. त्यानंतर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या 67 व्या अधिवेशनात 122 देशांनी या ठरावाला मजुरी दिली. त्यामुळे जॅक सिम यांच्या कार्याला मोठं यश आलं.
काय आहे जागतिक शौचालय दिवसाचं महत्व : उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांना सर्वाधिक आजारांचा सामना करावा लागतो. उघड्यावर शौचास गेल्यानं संसर्ग आणि विषारी कीटक चावण्याचा मोठा धोका असतो. हे टाळण्यासाठी नागरिकांना जागरूक राहणं गरजेचं आहे. त्यातच ग्रामीण भागात शौचास जाणाऱ्या महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही मोठी वाढ झालेली आहे. त्याला आळा घालण्यासाठी शौचालयाचा वापर होणं गरजेचं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही स्वच्छतेकडं विशेष लक्ष दिले होते, त्यांनी आपल्या एका वक्तव्यात स्वच्छता हीच सेवा असल्याचे म्हटलं होते, त्यामुळे गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येते. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी शौचालय दिन महत्वाचा असल्याचं अधोरेखित होते.
भारतात 19.04 टक्के नागरिक बसतात उघड्यावर :भारतात ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापर करत नसल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे सरकारनं स्वच्छ भारत अभियान सुरू केलं. तरीही 19.04 टक्के नागरिक उघड्यावर शौचास बसतात, असा अहवाल 2022 ला राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानं दिला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार तब्बल 18.6 टक्के घरांमध्ये शौचालय नसल्याचं उघड झालं होतं. मात्र 2013 नंतर उघड्यावर शौचास जाण्यावर आळा बसला. स्वच्छ भारत मिशननं (SBM) लाखो नागरिकांच्या शौचालय वापरावरबाबत जनजागृती केली. 2014 पासून तब्बल 50 कोटी नागरिकांनी उघड्यावर शौचास जाणं बंद केलं आहे.
हेही वाचा :
- आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस 2023 : आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवसाचा काय आहे इतिहास? जाणून घ्या यंदाची थीम
- पुरुषांच्या आत्महत्येत तिपटीनं वाढ, जाणून घ्या का साजरा करण्यात येतो आंतरराष्ट्रीय पुरुष दिन