हैदराबाद :World Suicide Prevention Day २०२३ : जगभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण तणाव, नैराश्य या आजारांना बळी पडतात. अशा परिस्थितीत बहुतेक लोक जीवनाचा त्याग करतात आणि मृत्यूला कवटाळतात. मात्र आत्महत्येच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार दरवर्षी सुमारे 8 लाख लोक आत्महत्येद्वारे आपला जीव गमावतात. आत्महत्या करणाऱ्यांच्या यादीत सर्वाधिक तरुणांचा समावेश आहे. ज्यांचे वय 15 ते 29 वर्षांच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे महत्त्व आणखी वाढते.
कधी सुरू झाला जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन : इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेन्शन (IASP) ने 2003 मध्ये प्रथमच 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा करण्यास सुरुवात केली. हा कार्यक्रम वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ आणि वर्ल्ड ऑर्गनायझेशनने प्रायोजित केला होता. या उपक्रमाचे जागतिक स्तरावर खूप कौतुक झाले. त्यानंतर, पुढील वर्षी 2004 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) औपचारिकपणे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे प्रायोजित केले. तेव्हापासून दरवर्षी १० सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो.
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाचे महत्त्व : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन जगाच्या कानाकोपऱ्यात साजरा केला जातो. यातील बहुतेक कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटनेने प्रायोजित केले आहेत. या दिवसाच्या मदतीने लोकांमध्ये केवळ जागरुकता वाढते असे नाही तर लोकांना आत्महत्येशी संबंधित विचार सोडून देण्यासही मदत होते. त्याचबरोबर भारतासह अनेक देशांची सरकारेही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)च्या या उपक्रमात मदत करत आहेत. जर लोकांना आत्महत्या करावी वाटत असेल तर ते सरकारी हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकतात आणि विनामूल्य समुपदेशन सत्रात उपस्थित राहू शकतात.