हैदराबाद : वाढत्या लोकसंख्येमुळे मातीची धूप कमी करण्यासाठी, सुपीक माती आणि संसाधन म्हणून मातीचा शाश्वत वापर याबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी अन्न आणि कृषी संस्थेद्वारे दरवर्षी 5 डिसेंबर रोजी 'जागतिक मृदा दिन' साजरा केला जातो. जशी पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे, त्याचप्रमाणे मातीचंही महत्त्व आहे. भारतातील निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. परंतु शेतकऱ्यांकडून शेतात अत्याधिक रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर केल्याने मातीचा दर्जा घसरत आहे. मातीचं संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचं झालं आहे. अन्न सुरक्षा, वनस्पतींची वाढ, जीवन आणि कीटक तसंच प्राणी आणि मानवजातीच्या अधिवासासाठी मातीचा ऱ्हास एक मोठा धोका आहे. भारतात सुमारे ४५ वर्षांपूर्वी 'माती वाचवा चळवळ' सुरू झाली.
जागतिक मृदा दिनाचा इतिहास :2002 मध्ये इंटरनॅशनल युनियन ऑफ सॉईल सायन्सेस (IUSS) ने जागतिक मृदा दिवस साजरा करण्याची शिफारस केली होती. FAO परिषदेने 20 डिसेंबर 2013 रोजी 68 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत एकमताने याबाबत अधिकृत घोषित केलं. थायलंडचे महाराज भूमिबोल अदुल्यादेज यांनी आपल्या कार्यकाळात सुपीक जमिनीचे संरक्षण करण्यासाठी खूप काम केले. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच ५ डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून समर्पित करून त्यांचा गौरव केला जातो. यानंतर दरवर्षी ५ डिसेंबरला मृदा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू झाली.