हैदराबाद : खराब झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर आजार उद्भवतात. त्यामुळे चांगली झोप केवळ आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठीच आवश्यक नाही तर मन प्रसन्न आणि शांत ठेवण्यातही ती खूप महत्त्वाची भूमिका बजावते. सध्या जगभरातील नागरिकांच्या झोपेवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत 17 मार्चला जगभरात जागतिक निद्रा दिन 2023 साजरा करण्यात येतो. नागरिकांना चांगल्या झोपेची आवश्यकता असल्याबाबतची जनजागृती या दिवशी करण्यात येते. जगभरातील लोकांना चांगली झोप घेण्याची जाणीव करून देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी झोप महत्त्वाची :चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. परंतु बहुतेक लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे योग्य प्रमाणात आणि चांगल्या दर्जाची झोप घेता येत नाही. खराब जीवनशैलीसोबतच जगभरातील आजार आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याचे प्रमुख कारण खराब झोप असल्याचे तज्ज्ञ स्पष्ट करतात. चांगल्या झोपेच्या गरजेबद्दल नागरिकांना जागृत करणे त्यासह शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगल्या दर्जाची झोप घेण्यास प्रवृत्त करणे या उद्देशाने दरवर्षी मार्च महिन्यात जागतिक झोप दिन साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस 17 मार्च रोजी साजरा केला जात आहे.
काय आहे जागतिक निद्रा दिनाची थीम :वर्ल्ड स्लीप सोसायटीने आयोजित केलेल्या दिनानिमित्त दरवर्षी नवीन थीमसह साजरा केला जातो. या वर्षी हा कार्यक्रम झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे या थीमवर साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे झोप हा आपल्या जीवनाचा एक अतिशय सामान्य भाग आहे. मात्र झोपेला बहुतेक नागरिक फारसे गांभीर्याने घेत नाहीत. परंतु कमी झोपेमुळे अनेक शारीरिक आणि मानसिक आजार होतात. मात्र आपल्या जीवनावर आणि दिनचर्येवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
सोशल मीडियावर सुरू आहे प्रचार :जागतिक निद्रा दिनानिमित्त जागतिक निद्रा सोसायटीचे सदस्यच नाही, तर ७० हून अधिक देशांतील अनेक सरकारी आणि निमसरकारी संस्था प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर उपक्रम आयोजित करण्यात येतात. या वर्षी या कार्यक्रमात सर्वसामान्यांना सहभागी करण्यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटी सोशल मीडियावर #WorldSleepDay या हॅशटॅगसह चांगल्या आणि वाईट झोपेचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा प्रचार करत आहेत.