हैदराबाद :आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन आहे. या दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पक्षाध्यपदाच्या राजीनाम्यानंतर पहिले ट्विट करत पत्रकारांना जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांनी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा मजबूत स्तंभ आहे. पत्रकारिता मूल्ये आणि निष्पक्ष पत्रकारितेचा बाणा जपण्याकरता पत्रकारांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा निर्धार जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त करूया, अशा शुभेच्छा शरद पवार यांनी दिल्या आहेत.
तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार कार्यरत असतात. समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी माध्यमातून अनेक पत्रकार आवाज उठवतात. मात्र पत्रकारांवर अन्याय अत्याचार आणि छळ करण्याच्या घटना आता वाढल्या आहेत. माध्यमातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी जागतिक संघटनेनेच्या वतीने 3 मे रोजी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो.
जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 2023 :इंडिया प्रेस फ्रीडम रिपोर्ट 2021 च्या अहवालात भारतात किमान सात पत्रकार मारले गेले आहेत. त्यासह 121 मीडिया हाऊसना लक्ष्य करण्यात आले. सर्वाधिक पत्रकार आणि माध्यम संस्थांना जम्मू आणि काश्मीरमध्ये लक्ष्य करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये किमान 25 माध्यमसंस्थांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर उत्तर प्रदेश 23 आणि मध्य प्रदेश 16 माध्यमसंस्थांना टार्गेट करण्यात आले. किमान आठ महिला पत्रकारांना अटक करण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अनेक महिला पत्रकारांना लैंगिक छळाचा सामना करावा लागल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.