हैदराबाद : जगभारातील अनेक नागरिकांना किडनीच्या आजाराने ग्रासल्याने मृत्यूचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन जागृती करण्यासाठी जागतिक किडनी दिन साजरा करण्यात येतो. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून २०२६ पासून जागतिक किडनी दिन साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. यावर्षी ९ मार्चला किडनी दिन साजरा करण्यात येणार आहे.
का करण्यात येतो किडनी दिन साजरा :जागतिक स्तरावर किडनी रोगाने ग्रस्त असलेल्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या किडनी रोगाला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी इंटरनॅशनल सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ किडनी फाउंडेशन यांनी ६६ देशात किडनी दिनाच्या आयोजनाला २०२६ मध्ये सुरुवात केली आहे. तेव्हापासून जगभरात जागतिक किडनी दिन साजरा करण्यात येतो.
कशामुळे होऊ शकते किडनी खराब :किडनी आजारामुळे देशभरातील अनेक नागरिकांवर नियमित डायलिसीसचा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे किडनीग्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य आहार घेणे गरजेचे आहे. मात्र असंतुलित आहारामुळे नागरिकांना किडनी आजाराचा सामना करावा लागत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. अस्वास्थ्य जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळे नागरिकांमध्ये किडनीबाबत समस्या निर्माण होतात. याशिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह, वेदनाशामक औषधांचे अतिसेवन आणि आनुवंशिकता यामुळेही किडनीला धोका होऊ शकतो, असेही तज्ज्ञ स्पष्ट करतात. नागरिकांना मूत्रपिंड निकामी होण्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. कधी अज्ञानामुळे तर कधी निष्काळजीपणामुळे किडनीचा आजार बळावतो. त्यामुळे किडनीचा आजार असल्याचे निदान होईपर्यंत 65 ते 70 टक्के मूत्रपिंड खराब झालेले असते.
एका वर्षात २ लाख नागरिकांचा मृत्यू :किडनीच्या आजाराने नागरिकांच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. भारतात एका वर्षात २ लाख नागरिकांचा मृत्यू किडनीच्या आजाराने होत असल्याचे विविध अहवालावरुन दिसून येते. तर भारतात दर पाच मिनीटात दोन नागरिक किडनीमुळे आपला जीव गमावत आहेत. दरदिवशी किडनीच्या आजाराने मृत्यू होणाऱ्या नागरिकांची संख्या तर ५४७ इतकी असल्याचेही किडनी तज्ज्ञांच्या विविध अहवालावरुन स्पष्ट होते.