हैदराबाद :जगभरातील लोकांमधील १.५ अब्ज नागरिक बहिरेपणा या आजाराशी लढा देतात. तर भारतातील २७ हजार नागरिकांना बहिरेपणांचा आजार होत आहे. त्यामुळे आपल्या कानाच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे यामधून अधोरेखीत होते. नागरिकांमध्ये कानाच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक श्रवण दिवस साजरा केला जातो.
काय आहे यावर्षी श्रवण दिनाची थीम : जगभरातील नागरिकांना बहिरेपणाच्या आजाराने ग्रासल्याचे दिसून येते. यात काही नागरिकांना आंशीक बहिरेपणा आहे, तर काही नागरिकांना जास्त प्रमाणात बहिरेपणा असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने ३ मार्च हा जागतिक श्रवण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यासाठी जागतिक श्रवण दिनासाठी एक थीम देण्यात येते. त्यामाध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. आरोग्य संघटनेने जागतिक श्रवण दिन २०२३ यावर्षासाठी सर्वांसाठी कान आणि कानाची काळजी अशी थीम घेऊन जनजागृती सुरू केली आहे. या थीमसह जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्याच्या उद्दिष्टांतर्गत जागतिक स्तरावर कान आणि श्रवणविषयक काळजी करण्याचे आवाहन केले आहे. कान आणि श्रवण तपासणी हे प्राथमिक गरजेमध्ये घेतल्यास सामान्य लोकांना श्रवणविषयक समस्यांचे निदान करण्यात खूप फायदा होऊ शकतो असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
भारतात साडेसहा कोटी नागरिकांना बहिरेपणाचा त्रास :जगभरातील बहिरेपणा असलेल्या नागरिकांची संख्या १. ५ अब्ज असल्याची माहिती विविध वेबसाईटवरील आकडेवारीनुसार असल्याचे दिसून येते. तर भारतात ही बहिरेपणाच्या त्रासाने ग्रासलेल्या नागरिकांची आकडेवारी तब्बल साडेसहा कोटीच्या वर आहे. भारतातील साडेसहा कोटी नागरिक अंशत: किवा पूर्णत: बहिरेपणाच्या आजाराने त्रस्त असल्याचेही विविध आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. नागरिक श्रवणशक्ती कमी होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात या समस्येकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे बहिरेपणाचा निदान होण्यास विलंब होतो. ही चिंतेची बाब असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
काय आहे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल :बहिरेपणाच्या आजारावर जागतिक आरोग्य संघटनेने पहिला अहवाल 2021 साली प्रसिद्ध केला. सन 2050 पर्यंत जगभरात सुमारे 2.5 अब्ज लोक किंवा प्रत्येक 4 पैकी 1 व्यक्ती कमी किंवा जास्त पातळीच्या श्रवणशक्तीच्या समस्येचे बळी ठरू शकते अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली होती. या अहवालात जागतिक स्तरावर श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका असलेल्या लोकांची संख्या वाढत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले होते. मोठ्याने आवाज ऐकणे आणि वाढते ध्वनिप्रदूषण ही श्रवणशक्ती कमकुवत होण्यामागची प्रमुख कारणे असल्याचेही जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यावर उपायोजना केली नाही, तर तर 2050 पर्यंत सुमारे 700 दशलक्ष लोकांना बहिरेपणा आणि श्रवणविषयक आजाराने ग्रासल्याची शक्यता या अहवालात नमूद करण्यात आली आहे.
भारतात दरवर्षी २७ हजार जणांना बहिरेपणाचा आजार :भारतात दरवर्षी 27 हजार मुले बहिरेपणाने ग्रस्त होत आहेत. परंतु जागरूकतेचा अभाव आणि वेळेवर योग्य तपासाणी होत नसल्याने त्यांना बहिरेपणाला तोंड द्यावे लागते. सुरुवातीच्या काळात बहिरेपणाकडे दुर्लक्ष देकेल्यामुळे बहुतेक प्रकरणांमध्ये निदानास उशीर होतो. श्रवणशक्ती कमी होण्याच्या अनेक प्रकरणांमध्ये ही समस्या वेळीच आढळून आल्यास प्रगत श्रवण तंत्रज्ञानाच्या मदतीने लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांनाही या समस्येपासून मुक्ती मिळू शकते असे डॉक्टरांचे मत आहे. यासाठी भारत सरकारच्या राष्ट्रीय बहिरेपणा प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भारत सरकारद्वारे चालवला जातो. रोग किंवा दुखापतीमुळे टाळता येण्याजोग्या श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी वैद्यकीय पुनर्वसनासाठी भारत सरकारकडून कार्य केले जाते.
वाढत्या वयाबरोबर कानाच्या नसा होतात कमकुवत :ऐकण्याच्या समस्येची अनेक कारणे असू शकतात असे डॉक्टरांचे मत आहे. त्यापैकी वाढते वय हे सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक वेळा माणसाच्या कानाच्या नसा कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे बहिरेपणा सुरू होते. प्राप्त आकडेवारीनुसार 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 33 टक्के नागरिकांना बहिरेपणाचा आजार दिसून येते. तर वयाच्या 74 व्या वर्षी ही संख्या 50 टक्केपर्यंत वाढत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय ध्वनीप्रदूषण, वाहनांचा आवाज, इअरफोनचा अतिवापर, मोबाईलवर जास्त वेळ गाणी ऐकणे, अपघात किंवा डोक्याला दुखापत, कानाचा संसर्ग आणि आनुवंशिकता अशा अनेक कारणांमुळे बहिरेपणा येऊ शकतो असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा - Artificial Sweetener Increased Heart Attack : एरिथ्रिटॉलचा कृत्रिम गोडवा ठरू शकतो हृदयविकाराच्या झटक्यास कारणीभूत