हैदराबाद :पृथ्वीवर अनेक जीव राहत असल्याने त्यांच्या जगण्यासाठी पर्यावरण संतुलन राखणे गरजेचे आहे. पृथ्वीवर वाढणाऱ्या प्रदूषणाने हाहाकार उडाला असून विस्कळीत जीवनशैलीमुळे अनेक धोके निर्माण झाले आहेत. त्यामुळे पृथ्वीवर पर्यावरण संतुलन राखण्याच्या उदात्त हेतूने 22 एप्रिल हा वसुंधरा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी पृथ्वीवरील पर्यावरणासह विविध समस्यांबाबत जनजागृती करण्यात येते.
काय आहे वसुंधरा दिनाचा इतिहास :पृथ्वीवरील प्रत्येक नैसर्गिक घटकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. आपली पृथ्वी 4.50 अब्ज वर्षापूर्वी तयार झाल्याचे वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील पाणी, जंगल, हवा यांचे संरक्षण करणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. अमेरिकेतील सिनेटर गेलार्ड नेल्सन यांनी वसुंधरा दिनाची संकल्पना सगळ्यात अगोदर मांडून त्याबाबत जनजागृती केली. त्यांनी दोन कोटीपेक्षा जास्त नागरिकांमध्या पर्यावरण रक्षण, प्राण्यांचा ऱ्हास याबाबत जनजागृती केली. अमेरिकेतील सिनेटर असलेल्या गेलार्ड नेल्सन यांनीच 22 एप्रिल 1970 मध्ये सॅनफ्रान्सिस्को येथे जागतिक वसुंधरा दिन साजरा केला. या कार्यक्रमाचे समन्वयक असलेले डेनिस हेस यांनी 1990 मध्ये 141 देशांमध्ये वसुंधरा दिनाचे आयोजन केले. डेनिस हेस यांच्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून 175 देशात वसुंधरा दिन साजरा करण्यात आला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 2009 साली 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. तेव्हापासून 22 एप्रिल हा दिवस अधिकृत जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.