हैदराबाद : जगभरात ऑटिझमने ग्रस्त नागरिकांची संख्या वाढत असून भारतात तब्बल 21 लाख 60 हजार ऑटिझमचे रुग्ण आहेत. मात्र ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरबाबत अजूनही समाजात जागृती नाही. हा आजार अजूनही दुर्लक्षित आहे, असेच म्हणावे लागेल. मुलाचे सामाजिक वर्तन वयानुसार बदलले पाहिजे, परंतु न्यूरोलॉजिकल कारणामुळे तसे होत नाहीत. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस दरवर्षी 2 एप्रिलला साजरा केला जातो. ऑटिझम या आजारामुळे मुलाच्या मेंदूचा योग्य विकास होऊ शकत नाही.
ऑटिझम म्हणजे काय :एक जटिल न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असे ऑटिझम आजाराला संबोधले जाते. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर ही मुलांमधील न्यूरो डेव्हलपमेंटल विकृतींद्वारे आलेली स्थिती आहे. ऑटिझमला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असेही म्हणतात. साधारणपणे हा आजार वयाच्या 3 वर्षापूर्वी प्रकट होत असून त्याचा त्रास आयुष्यभर सहन करावा लागतो. जन्माच्या वेळी हा आजार ओळखता येत नसून हळूहळू मुलांमध्ये या आजाराची लक्षणे पालकांना दिसून येतात. हा आजार सहसा पर्यावरणीय आणि अनुवांशिक घटकांच्या संयोजनामुळे होते.
काय आहेत ऑटिझमची लक्षणे :मुलांना वावरताना अडचण येऊन चेहऱ्यावर कोणताही हावभाव नसतो. यामुळे बोलण्यात अडचण येते. त्यासह मुलांचा आवाजही असामान्य होतो. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. सामाजिक संवाद आणि सामान्य मानसिक वाढ या दरम्यान बुद्धिमत्ता विकसित होत नाही. त्यावरुन मुलांमध्ये ऑटिझम हा आजार बळावत असल्याचे दिसून येते.