हैदराबाद :कला हे जगण्याचे साधन असल्याने मानव हा कलेशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे कलेचा विकास करण्यासाठी विविध कलाकार सतत कार्यरत असतात. या कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक कला दिन 15 एप्रिलला साजरा करण्यात येतो. जागतिक दर्जाचे चित्रकार लिओनार्दो दा विंची यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जागतिक कला दिन साजरा करण्यात येतो. त्यामुळे काय आहे कला दिनाचा इतिहास, याबाबतची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
कोण होते लिओनार्दो दा विंची :लिओनार्दो दा विंची यांचा जन्म इटलीतील विंची या गावात 15 एप्रिल 1452 मध्ये झाला होता. लिओनार्दो दा विंची महान चित्रकार होते. त्यांनी बनवलेल्या मूर्ती अप्रतिम होत्या, त्यामुळे ते मूर्तिकारही होते. वास्तुशिल्पी, संगीततज्ज्ञ आणि कुशल इंजिनिअरही होते. त्यामुळे लिओनार्दो दा विंची हे अल्पावधितच मोठे नावारुपाला आले होते. मात्र त्यासाठी त्यांना मोठे कष्ट घ्यावे लागले. विंची यांनी अतिशय कमी वयात आँद्रेआ देल वेरॉक्यो यांच्याकडे आपल्या कलेचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर विंची यांनी मिलानच्या दरबारात काम केले. येथेच त्यांनी लास्ट सफर ( अंतिम व्यालू ) हे जगप्रसिद्ध चित्र बनवले. मात्र 1499 मध्ये लुडोविकोच्या पतनानंतर विंची हे फ्लॉरेंसला परत आले. येथे त्यांनी मोनालिसाचे जगप्रसिद्ध चित्र बनवले. लिओनार्दो दा विंची यांनी काढलेले मोनालिसाचे चित्र आजही जगातील सर्वोत्तम चित्र मानले जाते.