महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sukhibhava

जागतिक लठ्ठपणा विरोधी दिवस: 'या' किरकोळ बदलांमुळे तुम्ही रोखू शकता लठ्ठपणा

सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढा देत असताना, आपण बैठी जीवनशैली स्वीकारली आहे. लॅपटॉपसमोर तासन् तास बसून राहिल्याने आणि जास्तीच्या खाण्यामुळे बऱ्याच लोकांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या व्यतिरिक्त, कोरोना साथीच्या रोगाची लागण होण्याच्या भीतीपोटी अनेक लोकांनी स्वतःला चार भिंतीच्या आत बंदिस्त करून घेतले आहे. तसेच नेहमीच्या शारीरिक व्यायामावर देखील मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे खाली दिलेल्या काही गोष्टींचे पालन करून तुम्ही लठ्ठपणा रोखू शकता.

World Anti-Obesity Day
जागतिक लठ्ठपणा विरोधी दिवस

By

Published : Nov 30, 2020, 11:24 AM IST

हैदराबाद - लठ्ठपणा हा केवळ शारीरिक आजाराचा एक प्रकारच नाही, तर ही आता जागतिक समस्या बनली आहे. बर्‍याच वैद्यकीय आणि आरोग्य संघटना लठ्ठपणाला समुळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लठ्ठपणा हा गंभीर आजाराचा प्रकार असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, लठ्ठपणा हा मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक आदीसारख्या इतर मेटाबॉलिक आजारांना कारणीभूत ठरतो. म्हणूनच, दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस लठ्ठपणा विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी लठ्ठपणाचा आरोग्यावर होणार्‍या परिणामाविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, लठ्ठपणा आणि अतिवजनामुळे दरवर्षी किमान २.८ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो.

सध्या संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढा देत असताना, आपण बैठी जीवनशैली स्वीकारली आहे. लॅपटॉपसमोर तासन् तास बसून राहिल्याने आणि जास्तीच्या खाण्यामुळे बऱ्याच लोकांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या व्यतिरिक्त, कोरोना साथीच्या रोगाची लागण होण्याच्या भीतीपोटी अनेक लोकांनी स्वतःला चार भिंतीच्या आत बंदिस्त करून घेतले आहे. तसेच नेहमीच्या शारीरिक व्यायामावर देखील मर्यादा आणल्या आहेत. लॉकडाऊन उठवल्यानंतर, बऱ्याच लोकांनी अतिवजन किंवा बॉर्डरलाइन लठ्ठपणाबद्दल तक्रारी केल्या आहेत. शिवाय लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक सामान्य असल्याचे दिसून आले आहे.

लठ्ठपणाची कारणे

- जेनेटिक्स

- आनुवंशिकता

- आरोग्यास घातक पदार्थ खाण्याची सवय

- आरोग्यास घातक जीवनशैलीची सवय

- बैठी जीवनशैली

- भावनिक घटक

- झोपेचा अभाव

- औषधे

- आरोग्याचे प्रश्न / रोग

- गर्भधारणा

लठ्ठपणा रोखण्यासाठी काही टिप्स

१. आरोग्यवर्धक अन्न खा

कार्ब आणि साखरेचे प्रमाण अधिक असलेले किंवा जास्त तळलेल्या पदार्थांचे किंवा पेयाचे सेवन करण्याऐवजी आरोग्यवर्धक अन्न खाण्याची सवय लावावी. एखाद्या दिवशी असे पदार्थ खाणे ठीक आहे, परंतु इतर दिवशी अशाप्रकारच्या खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चिप्स, बिस्किटे, कुकीज यांसारख्या पदार्थांऐवजी आरोग्यदायी स्नॅक्सवर भर दिला पाहिजे. तसेच घरी शिजवलेले अन्न खाण्यास अधिक प्राधान्य द्यावे.

२. नियमित व्यायाम करा

दररोज किमान ३० ते ४० मिनिटे व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. महामारीच्या काळात आपल्याला घराबाहेर पडणे शक्य नसले तरीही, घरीच्या घरी शारीरिक हालचाली करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही योगा, एरोबिक्स, स्पॉट जंपिंग, स्किपिंग आणि इतर अनेक इनडोअर शारीरिक ॲक्टीव्हीटींचा सराव करू शकता.

३. जास्त प्रमाणात खाणे टाळा

जेव्हा आपल्या आवडत्या पदार्थांचा प्रश्न असतो, तेव्हा आपण अशा पदार्थाचे मोठ्या प्रमाणात सेवन करत असतो. अशावेळी केवळ आतड्यांच्या समस्या उद्भवत नसतात तर आपल्या शरीरात काही अतिरिक्त पाउंड वजन देखील वाढत असते. बरेचजण याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत असतात. आपण नेहमी आपली भूक भागवण्यासाठी खाल्ले पाहिजे, तृप्त होण्यासाठी नव्हे. आपण सहसा आरोग्यास घातक अन्नासाठी हावरे असतो. पण अशा पदार्थाचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते.

४. कामातून छोटासा ब्रेक घ्या

बैठी जीवनशैली ही लठ्ठपणाचे प्रमुख कारण आहे. म्हणून स्क्रिनसमोर जास्त काळ बसून राहण्याऐवजी वारंवार ब्रेक घेणे आणि स्ट्रेचिंग करणे अथवा थोडेसे फिरणे गरजेचे आहे.

५. तणावमुक्त राहा

तणाव आणि चिंता देखील अति वजन किंवा लठ्ठपणाचे कारण ठरू शकते. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान करणे, चांगली झोप घेणे आणि मनाला आराम देणे गरजेचे आहे. शिवाय जास्तीचे अन्न खाणे टाळावे.

६. घाई करू नका

प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा, असा सल्ला आपल्या आजी- आजोबांनी दिलेला आपण ऐकला असेलच. त्यामागील मुख्य कारण असे आहे की, जास्त वेगाने खाल्ल्याने जास्त प्रमाणात अन्न खाण्याची शक्यता असते. ज्यामुळे वजन वाढते. तसेच आतड्यांसंबंधी आजार देखील उद्भवतात.

७. चांगली झोप घ्या

झोप देखील वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. झोपेच्या अभावामुळे हार्मोनल बदल होऊ शकतात, ज्यामुळे आपली भूक आणि लालसा वाढू शकते. म्हणून झोपेची योग्य सवय लावणे महत्त्वाचे आहे.

लठ्ठपणाचा प्रौढांच्या लैंगिक जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो. लठ्ठपणाचा परिणाम केवळ व्यक्तीच्या शरीरावरच होत नसतो, तर त्याच्या मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो. अशा व्यक्ती त्यांच्या शरीराच्या प्रतिमेबद्दल किंवा लोकांमध्ये थट्टेचे कारण बनण्याबाबत खूप जागरूक असतात. या सर्व कारणांमुळे तणाव, नैराश्य, चिंता आणि सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडण्याची भीती निर्माण होऊ शकते. म्हणूनच, लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी अगदी लहान लहान पावले उचलणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपल्या रोजच्या आहारात अधिक फळांचा आणि भाज्यांचा समावेश केला पाहिजे. स्वत:ला निरोगी, तंदुरुस्त आणि चयापचयाच्या इतर विकारांपासून दूर ठेवण्यासाठी संतुलित आहार आणि योग्य जीवनशैलीचा स्वीकार करणे गरजेचे आहे.

हेही वाचा -पुरुष वंध्यत्व किंवा अझोस्पर्मिया समजून घेताना..

हेही वाचा -वंध्यत्वाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलतोय

ABOUT THE AUTHOR

...view details