हैदराबाद : एचआयव्ही एड्स ( Human Immunodeficiency Virus ) हे मानवी आरोग्यासाठी मोठे घातक आव्हान मानले जाते. एड्स या आजारावर कायमस्वरूपी उपचार अद्याप शक्य नाही. परंतु त्याची योग्य काळजी घेतल्यास या आजाराचे गंभीर परिणाम बऱ्याच अंशी आटोक्यात आणले जाऊ शकतात. लस ही कोणत्याही रोगाविरूद्ध संरक्षण मानली जाते. त्यामुळे एचआयव्ही एड्सपासून बचाव करण्यासाठी लसीचे संरक्षण शोधण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आतापर्यंत एचआयव्हीवर लस शोधण्यात फारसे यश आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 18 मे रोजी जागतिक एड्स लस दिन साजरा करण्यात येतो.
एड्समुळे गेला लाखो नागरिकांचा बळी :एचआयव्ही एड्सने आतापर्यंत लाखो नागरिकांचा बळी गेला आहे. मात्र त्यावर औषध उपलब्ध नसल्याने एचआयव्ही एड्सबाबत काहीही उपचार करता येत नाहीत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार 2019 च्या अखेरीस तब्बल 38 दशलक्ष नागरिकांना एचआयव्ही एड्सने ग्रस्त होते. त्याचवर्षी एड्स आणि संबंधित आजारांमुळे सुमारे 6 लाख 90 हजार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. 2020 च्या अखेरीस एचआयव्ही बाधितांची संख्या तब्बल 37.7 दशलक्ष होती. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी 1.7 दशलक्ष 15 वर्षाखालील मुले होती. या आजारामुळे आणि त्याच्याशी संबंधित कारणांमुळे 2020 या वर्षी तब्बल 6 लाख 80 हजार नागरिकांचा बळी गेला.
जनजागृतीमुळे एड्सच्या मृत्यूत झाली घट :एचआयव्ही एड्स या आजारामुळे लाखो नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. मात्र आता सरकार आणि सामाजिक संस्थांच्या वतीने एचआयव्ही एड्सबाबत जनजागृती करण्यात येते. त्यामुळे एड्स आणि त्याच्याशी संबंधित कारणांमुळे नागरिकांचा जीव गमावण्याच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 2004 च्या तुलनेत 2020 मध्ये बळी आणि मृत्यूच्या संख्येत सुमारे 64 टक्क्यांनी घट झाली आहे.