हैदराबाद : महिला हा कुटुंबाचा आधार असल्याचे मानले जाते. मात्र घरकाम आणि नोकरी संभाळताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्यासह आपल्या आनंदाचाही विचार करणे गरजेचे आहे. जर महिला निरोगी आणि आनंदी असेल तरच त्या इतर जबाबदाऱ्या सुरळीतपणे पार पाडू शकतात.
महिला सगळ्यात शेवटी करतात स्वत:चा विचार :महिलांना कुटुंबासह आपल्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. त्यामुळे घर, कुटुंब, मुले, सर्व नाती, यांची जबाबदारी बहुतांशी कुटुंबातील स्त्रीयाच पार पाडतात. कधी मुलगी म्हणून, कधी पत्नी म्हणून, कधी आई म्हणून तर कधी सून म्हणून सगळी जबाबदारी महिलांच्या डोक्यावर असते. मात्र प्रत्येक जबाबदाऱ्या पार पाडताना प्रत्येकाच्या सुखाची, आरोग्याची काळजी घेताना ती आपल्याकडे दुर्लक्ष करते. स्त्री कमी शिकलेली असो वा जास्त शिकलेली, गर्भवती असो वा नोकरी, स्वतःचे आरोग्य चांगले ठेवायचे याबाबतचा विचार सगळ्यांच्या शेवटी तिच्या मनात येतो. सर्वांना आनंदी ठेवण्यापूर्वी स्वतःवर प्रेम करणे आवश्यक असल्याचे सगळेच जण बोलतात. मात्र तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल, आपली काळजी घेत नसाल तर तुम्ही तुमचे शंभर टक्के योगदान कोणालाही देऊ शकत नाही. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःची काळजी घेणेच असल्याचे उत्तराखंड येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ विजयालक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे.
उपचारांसाठी डॉक्टरांकडे येण्यास टाळाटाळ :बहुतेक स्त्रिया कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तपासणी आणि उपचारांसाठी डॉक्टरांकडे येण्यास टाळाटाळ करत असल्याचे डॉ विजयालक्ष्मी यांनी स्पष्ट केले. बहुतेक महिला आजही त्यांची नियमित तपासणी, त्यांची खाण्यापिण्याची दिनचर्याबाबत फारच बेफिकीर वागत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. नोकरदार महिला घर आणि ऑफिसमध्ये इतक्या व्यस्त होतात की त्यांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. घरातील कामे उरकून ऑफिसला पोहोचण्याच्या घाईत अनेक महिला एकतर नाश्ता करत नाहीत किंवा केला तरी शरीराच्या पोषणाच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. त्यांच्या रात्रीच्या जेवणासोबतही असेच काहीसे घडते. म्हणूनच मोठ्या संख्येने महिलांमध्ये केवळ लोहच नाही तर इतर अनेक आवश्यक पोषकतत्त्वांचीही कमतरता असते असेही डॉ विजयालक्ष्मी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
लहानपणापासून लावा सवय :मुलींना सुरुवातीपासूनच स्वतःची आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्या कोणाचीही काळजी घेऊ शकत नसल्याचे शिकवण्याची गरज असल्याचे डॉ विजयाल्क्षमी सांगतात. यासाठी योग्यवेळी पौष्टिक आहार घेणे आणि नियमित व्यायाम हा त्यांच्या दिनचर्येचा अत्यावश्यक भाग बनवणे हे त्यांना लहानपणापासूनच दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असेल तर त्यांनी त्याबद्दल सांगावे आणि उपचारात कधीही दुर्लक्ष करू नये असेही शिकवण्याची गरज असल्याचे डॉ विजयालक्ष्मी यांनी स्पष्ट केले.