लंडन :कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता स्पष्ट करणारी रक्तातील प्रोटिन्स (प्रथिने) ओळखण्यात संशोधकांना यश आले आहे. यामुळे आजाराची तीव्रता समजण्यास आणि त्यावर देखरेख ठेवण्यात मदत होणार आहे. ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातील वैज्ञानिकांचा समावेश असलेल्या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार सार्स कोव्ह-२ किंवा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आजाराला खूप वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतात. काही रुग्णांमध्ये मुळीच लक्षणे नसतात तर काहीजण अत्यंत अत्यवस्थ होऊन दगावतात.
'सेल सिस्टिम्स' जर्नलमध्ये नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, कोविड रोग वाढीची (रोग प्रसाराचा) आणि त्याच्या तीव्रतेचा अंदाज घेण्यासाठी विश्वासार्ह मार्ग म्हणून 'बायोमार्कर्स' (जैवचिन्हे) तयार करण्यासाठी कोविड-१९ रुग्णांमधील प्लाझ्मा या रक्त घटकाचा अभ्यास करण्यात आला. यूकेमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूटच्या मार्कस रेल्सर यांच्या नेतृत्वातील वैज्ञानिकांनी कोविड-१९ रुग्णांच्या रक्त नमुन्यातील प्लाझ्मामधील प्रथिनांचे विविध स्तर वेगाने अभ्यासण्यासाठी 'स्टेट ऑफ द आर्ट' विश्लेषणात्मक तंत्राचा वापर केला. या पध्दतीचा वापर करून, कोविड-१९ रुग्णांच्या रक्त प्लाझ्मामधील आजाराच्या तीव्रतेशी जोडले गेलेले विविध प्रोटीन बायोमार्कर्स शोधले.
कोविड-१९चा उपचार घेत असलेल्या आणि आजाराची तीव्रता वेगवेगळी असलेल्या ३१ पुरुष आणि स्त्रियांच्या रक्त प्लाझ्माच्या नमुन्यांचे विश्लेषण या अभ्यासासाठी संशोधकांनी वापरले. रोगाच्या तीव्रतेनुसार संख्येने कमी जास्त असणारी २७ वेगवेगळी प्रथिने रुग्णांमध्ये नोंदविण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, कोविड-१९ने त्रस्त असलेल्या आणखी १७ रुग्ण आणि निरोगी १५ लोकांच्या नमुन्यांचा अभ्यास करून संशोधकांनी या 'मॉलेक्युलर सिग्नेचर'ला वैध ठरविले आहे. ही 'प्रोटीन सिग्नेचर' वापरुन संशोधकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-१९साठी असलेल्या कोडिंग निकषांनुसार रुग्णांचे तंतोतंत वर्गीकरण केले.
अभ्यासाचे निष्कर्ष दोन भिन्न प्रयोगांसाठीचा मजबूत पाया असून भविष्यात रोगाच्या स्थितीचा अंदाज घेण्यासाठीचा संभाव्य वापर हा त्यापैकी एक आहे, असे रेल्सर यांनी स्पष्ट केले. रुग्णाच्या रक्ताचे नमुने लवकरात लवकर तपासून कोविड-१९ रुग्णांमध्ये आजाराची गंभीर लक्षणे उद्भवू शकतील किंवा नाही याचा अंदाज घेण्यासाठी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हा अभ्यास मदतगार ठरेल असे त्यांनी म्हटले.