हैदराबाद- कोविड 19जगभरात झपाट्याने पसरत आहे. सगळीकडे धोक्याची घंटा वाजत आहे. अशात आपण देश अनलॉक करायला सुरुवात केली आहे. या विषाणूसारखी लक्षणे दिसली की लोक चिंताग्रस्त होत आहेत. अनेकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झालाच तर कोणाला आणि कसा संपर्क साधायचा, हे अनेकांना माहीत नाही. म्हणून आम्ही हैदराबादच्या व्हीआयएन हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन,एमडी (जनरल मेडिसिन) डॉ. राजेश वुकला यांना विचारले. त्यावर ते सांगतात, 'हा विषाणू शरीरात कुठेही पसरू शकतो आणि म्हणूनच आपल्याला शरीरात अनेक लक्षणे दिसतात.'
ही लक्षणे महत्त्वाची
डॉ. राजेश यांनी सांगितल्याप्रमाणे ताप आणि कफ याव्यतिरिक्त दिसणारी लक्षणे
- गंध न येणे
- चव न लागणे
- अतिशय अशक्तपणा
- स्नायूंमध्ये अपार वेदना
- थकवा
- रोजचा दिनक्रम करणे अशक्य
- श्वास घ्यायला त्रास होणे
- डोकेदुखी
- चक्कर येणे
- तापाशिवाय अतिसार होणे
- पोटदुखी
- पाय दुखणे
"शिवाय ब्रेन अटॅक, हृदयविकाराचा झटका, मॅनिन्जिटीस, मज्जारज्जूवर परिणाम या लक्षणांबद्दल फारसे बोलले जात नाही. ते अगदी क्वचित उद्भवतात. पण त्यांचा उल्लेख आहे."
समजा तुम्हाला लक्षणे जाणवायला लागली तर काय कराल ?
डॉ. राजेश वुकला म्हणतात, 'हा नवा विषाणू पसरण्याचा वेग इतर विषाणूंपेक्षा जलद आहे. असे आढळले आहे की 80 टक्के लोकांना लक्षणे दिसत नाहीत. त्यांच्यात सौम्य लक्षणे आढळतात. 20 टक्के लोकांवर गंभीर परिणाम जाणवतात आणि 5 टक्के लोक अतिशय आजारी पडतात. त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागते.'
- तुम्हाला लक्षणे आढळली किंवा तुम्ही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची शंका तुम्हाला आली तर आधी स्वत: ला विलग करून घ्या.
- वरीलपैकी कोणतीही लक्षणे 3 दिवस राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- डॉक्टरांच्या प्रिसक्रिबशननुसारच चाचणी घेतली जाते. ती स्वॅब चाचणी असेल किंवा रक्त तपासणी असेल. लक्षणे सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी चाचणी केली तर परिणाम जास्त फलदायी असतात.
- समजा लक्षणे तीव्र असतील, तर चाचणी ज्या भागात ही लक्षणे दिसत आहेत, त्याच भागात घेतली जाईल. म्हणजे पोट, ह्रदय, फुफ्फुसे इत्यादी. म्हणजे नक्की कुठे त्रास होत आहे, हे पाहून चाचणी घेतली जाईल.
- ज्या लोकांना सौम्य किंवा काहीच लक्षणे जाणवत नाहीत त्यांना रुग्णालयात भर्ती व्हायची गरज नाही. त्यांनी घरी स्व विलीगीकरण करावे आणि गरज भासली किंवा तब्येत बिघडली तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
- रोज पुरेसे पाणी प्यावे.
- आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि डी घ्या. ही व्हिटॅमिन्स अनेक पदार्थांमध्ये आहेत. त्यांचे नियमित सेवन करावे.
- तुमच्या लक्षणांकडे नियमित नजर ठेवून 10 दिवस विलीगीकरणात राहा.
- तुम्ही 20 टक्क्यांमध्ये असाल तर तुमची लक्षणे वाढली किंवा तुमची लक्षणे गंभीर झाली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करा. कदाचित तुम्हाला रुग्णालयात भर्ती करावे लागेल आणि अनेक चाचण्या घेऊन त्याप्रमाणे उपचार केले जातील.
अर्थात, तुम्ही चिंता करू नका. अनेकजण रुग्णालयात जाऊनही चांगले बरे होऊन आलेत. जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही तुमची काळजी घेणे, स्वत:ला विलग ठेवणे आणि कमीत कमी संसर्ग व्हावा म्हणून लोकांना न भेटणे हे सगळे करू शकता.