लंडन :कोरोनामुळे भारतासह जगभरातील अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोनाच्या बाबतीत नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरल्याचे दिसून येते. अद्यापही कोरोनाची दहशत कमी झाली नसून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. दुसरीकडे मात्र लसीकरण झालेल्या नागरिकांना दीर्घ कोरोनाचा धोका निम्म्यावर कमी होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मात्र लठ्ठ नागरिक, धूम्रपान करणाऱ्या नागरिकांसह ४० पार केलेल्या नागरिकांना दीर्घ कोरोनाचा धोका असल्याचेही या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणाला होऊ शकतो दिर्घ कोरोनाचा धोका :लसीकरण केल्यामुळे कोरोनाचा धोका कमी होत असल्याचा दावा इस्ट अँग्लिया विद्यापीठाचे प्राध्यापक व्हॅसिलिओस व्हॅसिलिओ यांनी केला आहे. प्राध्यापक व्हॅसिलिओ यांनी ८ लाख ६० हजार रुग्णांवर संशोधन केले आहे. या संशोधनात त्यांनी कोरोनाचे लसीकरण केल्यामुळे लोकांचा दीर्घकाळ कोविड विकसित होण्याचा धोका कमी होतो. मात्र लठ्ठ नागरिक आणि स्त्रिया, धूम्रपान करणाऱ्या आणि 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही दीर्घ कोविडचा त्रास होण्याची शक्यता असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. संशोधकांनी केलेल्या दाव्यावरुन कोरोनाची लस घेतली तरी काही पथ्य पाळावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याव्यतिरिक्त दमा, मधुमेह, हृदयरोग, चिंता आणि नैराश्य यासारख्या आजाराने ग्रस्त नागरिकांनाही कोविडचा धोका वाढतो. ज्या रुग्णांना कोरोना संसर्गादरम्यान रुग्णालयात दाखल केले, त्यांनाही दीर्घ कोरोनाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असल्याचेही या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.