वॉशिंग्टन (यूएसए) - कोविड-१९वर यशस्वीरीत्या मात केलेल्या रुग्णांनी स्वतः हून पुढे येऊन त्यांच्या प्लाझ्मा दान कराव्यात यासाठी अमेरिकेतील वैद्यकीय आणि संशोधन संस्था, परोपकारी संस्था, बचाव गट आणि इतर कंपन्यानी एकत्रित येत मोहिमेला सुरुवात केली आहे.
कोविड-१९ आजारातून सुखरूप बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्या किमान एक लाख नागरिकांना 'ब्लड प्लाझ्मा'चे दान करण्यासाठी एकत्रित आणण्याचा 'द फाईट इज इन अस' या मोहिमेचा उद्देश असल्याचे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
उत्तर गोलार्धात येत्या हंगामात कोविड-१९च्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि कोविड-१९मधून बचावलेल्या रुग्णांच्या प्लाझ्मामध्ये विषाणू विरोधात लढणारी प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) अधिक संख्येने असल्याने पहिल्या दोन महिन्यांच्या आतच त्यांच्या प्लाझ्मा मिळविणे असा या मोहिमेचा दुहेरी हेतू आहे.
"कोविड-१९मधून बचावलेल्यांमध्ये विषाणूचा प्रतिकार करणाऱ्या अँटिबॉडी-समृद्ध रक्त प्लाझ्मा आहेत, या प्लाझ्मा महामारीची लागण थांबविण्यास मदत करू शकतील. त्यामुळे सुपरहीरो स्वयंसेवकांनी स्वतःहून पुढे येत प्लाझ्मा दान करून कोविड-१९ला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज आहे," असे सर्व्हायव्हर कॉर्प्सचे संस्थापक डायना बेरेन्ट यांनी म्हटले आहे.
जे व्यक्ती कोविड-१९मधून सुखरुप बरे झाले आहेत किंवा ज्यांना अशा व्यक्तींविषयी माहिती आहे त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून स्वतः ला TheFightIsInUs.orgवर नोंदणी करून स्व-स्क्रीनिंग टूलचा वापर करून किंवा जवळच्या रक्तपेढीला किंवा प्लाझ्मा केंद्राला भेट देऊन आपण प्लाझ्मा देण्यास पात्र आहोत किंवा नाहीत याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. कोविडमधून बचावलेल्यांना प्लाझ्मा दान करता याव्यात यासाठी सद्यपरिस्थितीत १,५००हून अधिक संपर्क केंद्रे कार्यरत आहेत.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होऊन जे स्वयंसेवक आपल्या ब्लड प्लाझ्मा दान करतील त्या प्लाझ्माचा उपयोग करण्यासाठी दोन भिन्न पध्दती वापरल्या जाणार आहेत. त्यानुसार पहिल्या भागात, प्लाझ्माचे थेट रक्तसंक्रमण करून रुग्णांना वाचविण्यासाठी त्याचा वापर करण्यात येईल. तर दुसऱ्या भागात हायपर इम्यून ग्लोब्युलिन (एच-आयजी) म्हणून ओळखल्या जाणार्या औषधाच्या विकासासाठी वापर करण्यात येईल. या वर्ष अखेरीस या औषधांची क्लिनिकल चाचणी घेण्यात येईल. या मोहिमेला अमेरिकेत सुरुवात झाली असली तरी युरोपमध्ये देखील त्याचा विस्तार करण्याची या संयुक्त गटाची योजना आहे.